Tuesday, May 26, 2020

भाग २१ - वालचंद सोडताना


गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्हे. तेंव्हा वाचकांना कंटाळा येण्यापूर्वी थांबलेलं चांगलं. नाही का?
खरंतर स्वतःसाठी म्हणून लिहायला सुरुवात केली होती.  माझे वालचंदमधले अनुभव मी सगळ्यांसाठी शब्दबद्ध करावेत म्हणून पाठपुरावा करणारी विद्यार्थिनी मैत्रीण वैष्णवी आणि हे लेखन  ब्लॉग रूपात पब्लिश करायचं ठरवल्यावर blog चे होमपेज वगैरे तयार करायला मदत करणारी ऋतुजा आणि  सुरुवातीचे काही भाग बारकाईने वाचून त्यात  सुधारणा सुचवणारा एक विद्यार्थी मित्र आदित्य सर्वांनाच मनापासून धन्यवाद...मी सुचेल तसं लिहित जायचो ,त्यामुळे लेखाचा आशय मला किंवा काँलेज संबंधित कुणी वाचला तर समजेल असा असायचा .पण बाहेरच्या कुणी हे लेख वाचले तर संदर्भ लागतील असे नव्हते. शिवाय अनेकदा माझं लेखन complecated  व्हायचं. संयुक्त वाक्यं व्हायची.  मग प्रत्येक भाग बारकाईने वाचून त्यात सुटसुटीतपणा, सोपेपणा आणण्याचं आणि वाक्यरचना , शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याचं काम न कंटाळता प्राची करते आहे .त्यामुळे हे सगळे लेख वालचंद कॉलेजचा संदर्भ नसणाऱ्यांना सुद्धा वाचनीय वाटत राहिले. अनेकांनी लेखन आवडत असल्याचा प्रतिसाद दिला तर काहींनी त्यांच्या आठवणी, अनुभव यांची जोड कॉमेंट मधून दिली. त्यामुळेच खरंतर सलगपणे इतके दिवस लिहीत राहायचा उत्साह टिकला. हे सगळे लेखन हे त्या त्या अनुभवांच्या, मनातल्या आणि स्मरणातल्या नोंदींवरून करत होतो. रोज दैनंदिनी वगैरे लिहिण्याएवढा मी consistent नाही(दैनंदिनी लिहायची
सवय अलिकडे  लावून घेतो आहे)  इतर अनेकांप्रमाणे अनुभव किंवा प्रयोगांचे डॉक्युमेंटेशन करण्याबाबत मी पुरेसा आळशी आहे. त्यामुळे कुठल्याच अनुभवांच्या लिखित नोंदी नाहीयेत. त्यामुळे कदाचित काही तपशील चुकले असतील. तसेच लेखन त्यादिवशी सुचेल त्या विषयावर झालेले आहे. म्हणावी तशी सलगता नाही. पण त्यामुळेच प्रत्येक भाग स्वतंत्रपणे वाचनीय झाला असावा.
वालचंद मध्ये अनेक सहकारी लाभले. काही दीर्घकाळ तर काही कमी कालावधी करता. काही खूप चांगले मित्र झाले, तर काहींबरोबर टोकाचे वादही झाले. पण या सगळ्यांकडूनच मी खूप काही शिकलो. त्यांनी वालचंद सोडल्यावर किंवा आता मीही वालचंद सोडल्यावर.. त्यापैंकी बऱ्याच जणांशी संपर्क टिकून आहे. खरंतर या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल लिहायचं राहून गेलंय याची जाणीव आहे. मी वालचंदला काय दिलं हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण वालचंदने मला काय काय दिलं असा थोडा स्वार्थी वाटणारा विचार आज करतो. त्यापैकी सगळ्यात मोठी भेट म्हणजे खूप चांगले काही  'शे' विद्यार्थी. २०१० ते २०२१ या कालावधीत बाहेर पडणाऱ्या बारा तुकड्यांना मी प्रत्यक्ष शिकवलं. हिशोब काढला तर ती संख्या ९०० च्या पुढे जाईल. मला खरं घडवलं ते या सगळ्यांनी. दहाहून अधिक वर्षांचा कालावधी या सगळ्यांमुळे खूप आनंदात गेला. अशा सगळ्या विद्यार्थ्यांबरोबरच्या खूप आठवणी आजही ताज्या आहेत. जश्या माझ्या मनात आहेत तशाच अनेकांच्या मनात असणार आहेत. मग त्या सगळ्या कागदावर उतरवायचा  अट्टाहास नको म्हणून प्रातिनिधिक आठवणी लिहिल्या.
गेले वीस दिवस हे सगळं वाचत असताना एक प्रश्न अनेकांना पडला असेल. काही जणांनी तो प्रत्यक्ष विचारला तर काहींना त्याचे उत्तर कळल्याचा भास झाला. टाटा मोटर्स सोडून वालचंद मध्ये का आलोया प्रश्नाचे उत्तर देणं अवघड आहे त्यापेक्षा वालचंद का सोडलंया प्रश्नाचे उत्तर देणे कितीतरी जास्ती अवघड आहे. दोन्ही प्रश्नांना शिकवायची हौस होती म्हणून वालचंद मध्ये आलोआणि वेगळे काहीतरी करून बघायचं होतं म्हणून वालचंद सोडलंअसं एका वाक्यात उत्तर देऊ शकतो. पण तसं करणं उचित नाही. त्यातून अनेक प्रश्न सुरु होतात. पहिला, ‘वेगळं काहीतरी करून बघायला वालचंद सोडायलाच हवं होतं का (म्हणजे सरकारी अनुदानित महाविद्यालयातली सातव्या वेतन आयोगाचा पगार देणारी कायमस्वरूपी नोकरी सोडायची काही गरज होती का)?’ आणि दुसरा, ‘वालचंद मधल्या राजकारणाला, त्रासाला, चांगल्या उपक्रमांना झालेल्या विरोधामुळे कॉलेज सोडलं का?’ या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणे त्या मानाने सोपे आहे. वालचंद मध्ये येताना कधी मिळणाऱ्या पगाराचा जास्ती विचार केला नव्हता. इथे शिकवत असताना आणि वर्गाबाहेर अनेक उपक्रम करत असतानाही त्यातून किती पैसे मिळतील असा विचार केला नव्हता. मग सोडताना तरी तो विचार कशाला? सरकार कृपेने पेन्शनची बेडी ही आमच्या पिढीच्या पायात नाही. तसेच राजकारण, विरोध, त्रास हे सगळे समाजव्यवस्थेचे एक भाग आहेत. वालचंद मध्ये कधीकधी त्याचा कहर झाला ही गोष्ट खरी आहे. पण या विरोध, राजकारण या गोष्टींना कंटाळून वगैरे मी वालचंद सोडलं नाही. त्या सगळ्यावर मात करायची किंवा ते सगळं बाजूला ठेवून आपण ठरवलेलं चांगलं काम करत राहण्याची शक्ती ही याच वालचंदमध्ये मला मिळाली हे ही नाकारता येणार नाही.
 २०१७ पासूनच वालचंद मधून बाहेर पडायचा विचार डोक्यात सुरू झाला. आपली कुठलीही नकारात्मक भावना या विचारामागे नाही ना? हे तपासण्यात पहिले काही महिने गेले. त्यानंतर मात्र कॉलेजमध्ये दहा वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये कॉलेजमधून बाहेर पडायचं असं पक्क  ठरवलं होतं. तोपर्यंत मी वालचंद मध्ये establish झालो होतो की नाही माहिती नाही पण वालचंद हा comfort zone झाला होता. comfort zone मधून बाहेर पडल्याशिवाय प्रगती करता येत नाही हे theoretically खरं असलं तरी comfort zone च्या बाहेर पडणं practically तितकंच अवघड असतं. आणि म्हणूनच त्यासाठी लागणारी शक्ती गोळा करणं पुढची दोन वर्ष चालू होतं. याच कालावधीत, मी योग्य दिशेने आणि सर्व दिशांनी विचार करतोय ना, स्वतःबरोबरच इतरांचा पण विचार करतोय ना, हे बघण्याचं काम ; कधी विरोध करून, कधी support करून, कधी प्रश्न विचारून, कधी बोलून तर कधी न बोलून प्राची करत होती, हे माझं सुदैव. वालचंद सोडताना सगळ्यात मोठी अडचण काय होती तर उत्तम विद्यार्थ्यांना सोडून जावं लागणार  ही. अनेकांना आश्चर्य वाटेल पण दरवर्षी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर एक  घनिष्ठ नातं निर्माण झालेलं होतं. म्हणूनच शेवटच्या दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने त्यातून बाहेर पडू असं ठरवलेलं होतं. ते फारसं जमलं नाही म्हणा. म्हणूनच मग वालचंद मधलं वास्तव्य आणखी ६ महिने लांबवावंसं वाटलं.
मी राजीनामा देणार आहे हे जवळच्या सहकाऱ्यांना आधीचे काही महिने सांगत होतो. पण त्या कुणाला ते पटत नव्हतं किंवा ते पटवून घेत नव्हते. अगदी १३ नोव्हेंबर २०१९ ला मी आज राजीनामा देतोयअसं सांगितल्यावरही त्यांना ती चेष्टाच वाटली. सहकाऱ्यांना हे सांगणं त्यामानानी सोपं होतं पण विद्यार्थ्यांना सांगणं आणि पटवणं जास्त अवघड गेलं.
त्या सेमिस्टर मधल्या फायनल इयर वरच्या शेवटच्या तासाला हा माझाही वालचंद मधला शेवटून दुसरा तास आहे” (शेवटचा तास दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्गावर होता) असं जाहीर केल्यावर सुद्धा कोणी ते seriously घेतलं नाही. कारण ही बातमी संध्याकाळपर्यंत त्या तासाला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नव्हती. एरवी अशी काही बातमी काही सेकंदातच सगळीकडे पसरते. त्याच रात्री मग ही बातमी आश्चर्यकारकरीत्या अन्य विभागात काम करणाऱ्या एका शिक्षक सहकाऱ्यांनी काहीसा विचित्र मेसेज पाठवून (हे असलं सगळं  वालचंद मधे चालायचंच असं मी गृहीत धरलं होतं.) सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. माझं काम सोपं झालं. अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरुद्ध निषेधही नोंदवला.
शेवटचा महिना..डिसेंबर.. नेहमीप्रमाणे परीक्षा. त्यासाठी पेपर काढणे, पेपर तपासणे, प्रॅक्टिकल-ओरल परीक्षा यातच गेला. कॉलेज प्रशासनाने पण अपेक्षेप्रमाणे राजीनामा लगेच स्वीकारला आणि कधी नव्हे ते बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी तत्परतेने केल्या. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे.
शेवटचा दिवसही नेहमीप्रमाणे सुरू झाला. आदल्या दिवशीच परीक्षेसंबंधीची सगळी कामं पूर्ण केली होती. बरेच सहकारी आणि अनेक विद्यार्थी सुट्टीवर होते. काही विद्यार्थी भेटून गेले. काही सहकारी गप्पा मारून गेले. मला मात्र काय करावं कळत नव्हतं. एक निर्विकार स्थिती होती. कारण आनंद तर नक्कीच नव्हता ,ना कुणाबद्दल राग होता. दोन्ही बाजूंनी काही कटू न होता मी वालचंद मधली नोकरी सोडत होतो, माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी म्हणून इथे येत राहीनच असा विश्वास होता, त्यामुळे मग दुःखही मर्यादित होतं.
विभागात झालेला अनौपचारिक निरोप समारंभ हे त्या दिवशीचे पहिले आश्चर्य. कारण प्रथेप्रमाणे फक्त सेवानिवृत्त होणाऱ्यांचाच निरोप समारंभ व्हायचा. राजीनामा देणाऱ्यांचा निरोप समारंभ झालेला आठवत नव्हता. पण तो छोटेखानी गप्पांचा कार्यक्रम खूप छान झाला. त्याचे फोटो श्री. भंडारी सर यांनी facebook वर टाकल्यामुळे मग बातमी जगजाहीर झाली.
पण दुसरा आश्चर्याचा धक्का बसला जेंव्हा एका विद्यार्थ्याचा मेसेज आला सर, आमची ओरल चालू आहे तेंव्हा सहा वाजेपर्यंत थांबा. आणि घरी यायला उशीर होईल असे कळवून ठेवा.संध्याकाळी फायनल ईयरचा जवळजवळ सगळा वर्ग एकत्र जमला होता. दरवर्षी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होत असतो. पण आता ते सगळे मला निरोप द्यायला जमले होते. दुर्मीळ प्रसंग ना! सुरुवातच झाली प्रश्नोत्तरांनी. फक्त आज ते सगळे प्रश्न विचारत होते आणि मला उत्तरं द्यायची होती. आधीची तीन वर्षं वर्गात आणि परीक्षेत अवघड अवघड प्रश्न विचारून  मी त्यांना त्रास दिला होता ना. त्याचा जणू बदला घेतला जात होता. नंतर अनेकांनी माझ्याबद्दल लिहिलेल्या आठवणींचे एक आणि वर्गातल्या प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा असलेले एक अशी दोन सुंदर भेट कार्ड मला दिली.


 
शेवटी सगळ्यांनी मिळून खाल्लेला केक
आणि काढलेले अनेकानेक फोटो.
राजीनामा देऊन नोकरी सोडणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी दिलेला इतका हृद्य निरोप समारंभ क्वचितच घडत असेल नाही. मी नशीबवान आहे इतकंच म्हणेन! 
काँलेज, त्यातले विद्यार्थी, सिलँबस,शिक्षणपद्धती, इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दलची माझी मतं असं खूप काही लिहिता येईल..पण , पण मी लेखाच्या सुरुवातीला म्हंटलं तसं मी लेखक नाही.. म्हणून केवळ स्वतः घेतलेल्या अनुभवांवर आधारित ही "वालचंद डायरी" आज संपवत आहे.  

Monday, May 25, 2020

भाग २० - Baja – पुनःश्च हरी ओम्

२०१५ मध्ये efficycle दोन वर्षाच्या खंडानंतर सुरू झालं. Baja मध्ये भाग घेऊन चार वर्षे उलटून गेली होती. Main Baja (MBaja) बरोबरच electric Baja (EBaja) चालू झालेलं होतं. आता नव्याने स्पर्धेत सहभागी होणे अवघड झालं होतं कारण या चार वर्षात स्पर्धा खूप कठीण झालेली होती. आपले विद्यार्थी त्यात सहभागी होत नाहीत याचं वाईट वाटायचं. २०१२ च्या स्पर्धेवेळी अगदी first year ला असणारे विद्यार्थी पण आता बाहेर पडलेले होते. म्हणजे निखारा पूर्णपणे विझला होता. नुसती फुंकर पुरणार नव्हती. कुणीतरी आतून पेटायला होतं. मार्च २०१६ मध्ये third year मधल्या चार मुली भेटायला आल्या. सर, आम्हाला Baja करायचंय.मला काय बोलावं कळेना, करायचं म्हणजे? ते काय गॅदरींगमध्ये डान्स करण्यासारखं आहे का?” असे शब्द मी फक्त ओठावर येऊ दिले नाहीत. या चौघी डिप्लोमा करून डिग्रीला आलेल्या होत्या आणि तोपर्यंत वर्गात त्यांची उपस्थिती कधी फारशी जाणवली नव्हती. मी मग जास्त उत्साह न दाखवता बघूएवढंच उत्तर दिलं. दुसर्‍या दिवशी त्याच वर्गातल्या अजून दोन मुली  आल्या. “Baja करायचंय.असे दोन गट भेटून गेले तरी मी थोडा साशंक होतो. त्यांनी मात्र पाठपुरावा सोडला नाही. २५ जणांची टीम होणं पण अवघड आहे असं वाटत होतं कारण त्यांच्या वर्गातले अनेक दिग्गज लोक GATE च्या क्लाससाठी हैदराबादला जायच्या तयारीत होते, काही जण internship ला जायच्या तयारीत होते तर खालच्या वर्गातले लोक efficycle आणि efficar टीममध्ये आधीच दाखल झालेले होते. पण त्यांची जिद्द मोठी होती. पुढच्या वेळी भेट झाली तेंव्हा तर, “आम्ही Ebaja ला रजिस्टर करणार आहोत. कारण ती स्पर्धा नवीन आहे. टीम पण कमी असतात. शिवाय इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रॉनिक्स मधून पण लोक सहभागी होऊ शकतात. २५ ची टीम तयार झालेली आहे. ही यादी.यादी पहिली. २५ पैकी १७ मुली!! यापैकी तीन इलेक्ट्रॉनिक्स मधल्या, दोन इलेक्ट्रिकल मधल्या, बाकी थर्ड इयर आणि फायनल इयर मेकॅनिकल मधल्या. या टीमने Baja शक्य आहे का? असा विचार करत असतानाच, “इलेक्ट्रिकलचे मोरे सर एक faculty advisor व्हायला तयार आहेत. मेकॅनिकल मधून तुम्ही होणार का?” हे वाक्य आदळलं. एकंदर गाडीत प्रवासी बसलेले होते, शिट्टी वाजली होती, शेवटची जागा शिल्लक होती, त्या गाडीत चढायचं की नाही हे मला ठरवायचं होतं.
 काय केलं मी? चढलो का गाडीत? गाडी किती स्टेशन पुढे गेली? हे सगळं आता सांगतो.
परत एकदा अभी नही तो कभी नहीअशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे म्हणा किंवा  कोणी शिक्षक तयार न झाल्यामुळे ह्या मुलींच्या उत्साहावर पाणी पडू नये म्हणून म्हणा  मी तयार झालो. खरंतर या टीमला एका महिला शिक्षक मार्गदर्शकाचा जास्त उपयोग झाला असता. (२०१२ पासून विभागामध्ये किमान एक तरी कायमस्वरूपी महिला शिक्षिका पाहिजे असा आग्रह मी मांडत होतो. पण.... असो)
EBaja हा एक चांगला initiative होता. इथून पुढच्या काळात electric vehicle मोठ्या प्रमाणात बाजारात येणार हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना त्यातले एक Exposure आणि  Expertise मिळावं हा खूप चांगला हेतू आहे. स्पर्धा म्हणून विचार केला तर बाकी ATV तशीच फक्त इंजिन च्या ऐवजी बॅटरी आणि मोटार असा बदल. अर्थात त्याला लागणारे circuit, controller, charger या गोष्टी वाढत जातात. त्यामुळे गाडीचे वजन आणि किंमत दोन्ही बरेच वाढते.
पहिला डिझाईन प्रेझेंटेशनचा टप्पा बेंगलोरला पार पडला. मुख्य फेरीसाठी निवड झाली. बॅटरी, मोटर, चार्जर, कंट्रोलर हे सगळं सगळ्या संघांसाठी समान असणार होतं आणि महिंद्रा इलेक्ट्रिक कडून विकत घ्यायचं होतं. ह्या E-kit ची किंमत जवळजवळ चार लाख रुपये होती. पण आधी बाकी गाडी बनू देत मग त्याचा विचार करु असं ठरलं.
टीम मध्ये मुली मोठ्या संख्येने असल्यामुळे रात्री उशिरा काम करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे थोडं सावकाश काम सुरू होतं. Bhabha Engineering च्या लिमये सरांनी खूप मदत केली. त्यांच्या कारखान्यातली एक जागा या प्रकल्पासाठी दिली. पाईप bending, वेल्डिंग या सुविधा त्यांच्याकडे असल्यामुळे Roll-cage किंवा गाडीचा सांगाडा तिथे तयार केला. Wheel End साठी एका विशिष्ट Aluminium Alloy चा वापर करून त्याचं कास्टिंग करायचं असे ठरले. त्यामुळे वजन खूप कमी होणार होतं. ते सगळं डिझाइन करणं खूप आव्हानात्मक होतं. शिवाजी  सुतार सरांच्या मदतीने त्याचा लाकडी pattern तयार झाला आणि मग प्रत्यक्ष casting वगैरे बाहेर केलं. हळूहळू कामाला गती येत होती. दिवाळीच्या सुट्टीत पण, ठरावीक काम झाल्याशिवाय घरी जायचं नाही असे ठरवल्यामुळे,त्यावर्षी लक्ष्मीपूजन-पाडवा अशी मर्यादित दिवाळी झाली.
एवढ्या मोठ्या संख्येने मुली काम करत आहेत असं पहिल्यांदाच घडत होतं. सगळी कामं मुलांनाही लाजवेल अशा उत्साहात सुरू होती. MIDC मधून परत येताना एकदा दोघींना अपघात झाला. पण दोन दिवसात दोघीही कामाला लागल्या. मी सोडून अन्य कोणी शिक्षक आणि बहुधा त्यांच्या घरी पण हे माहिती नसावं. Ekit साठीचे पहिले दीड लाख रुपये सगळ्यांनी मिळून भरले. पण पुढचे अडीच लाख भरायची वेळ आली तेंव्हा सगळेच जागे झालो. कॉलेज कडून मागायचे तर कुठल्या प्रकारे? मी आणि मोरे सर दोन-तीन पर्याय घेऊन संचालकांना भेटलो. TEQIP च्या Equipment Procurement च्या बजेटमधून त्याला मान्यता मिळाली. पण ही सरकारी प्रक्रिया. Approval, Quotation, Comparative statement, त्यावर ढीगभर लोकांच्या सह्या. त्यात परत सगळे करायचे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या माध्यमातून. टीम मधली एक विद्यार्थिनी आणि मी जवळजवळ महिनाभर हा उद्योग करत होतो. पण कॉलेज advance payment करत नाही आणि advance पैसे मिळाल्याशिवाय महिंद्रा Ekit देणार नाही अशा कात्रीत आम्ही सापडलो. अनेक पर्यायांचा विचार केला. अगदी कॉलेजच्या पतपेढी कडून तात्पुरते कर्ज काढायचा विचार पण झाला. पण सुदैवानं तशी वेळ आली नाही.
इकडे डिसेंबर मध्ये कॉलेजला सुट्टी होती. वर्कशॉपमध्ये काम करायला परवानगी मिळाली. पण वेल्डिंग मशीन वापरायचे नाही असे सांगून ते कुलपात ठेवण्यात आले. अडचणी तयार करण्यात काँलेजमधली काही  मंडळी एक्सपर्ट होती. एक दिवस बाहेरून वेल्डिंग मशीन भाड्याने आणले. पण असं किती दिवस करणार. शेवटी टीमने निर्णय घेतला आणि पोर्टेबल वेल्डिंग मशीन विकत आणले. पुढच्या अनेक टीमने ते मशीन वापरले, अजून वापरत आहेत. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी  त्यावर वेल्डिंग करायला शिकले. अनेक सर्धांच्या ठिकाणी आमच्या मुला-मुलींनी VJTI - COEP पासून SRM – KIT पर्यंतच्या नामवंत कॉलेजमधल्या टीमना वेल्डिंग करायला मदत केली. प्रत्येक अडचणी मधून काहीतरी चांगलं घडवता येतं याचे एक उत्तम उदाहरण. असे अनेक प्रसंग, घटना आहेत.( Problem solving संदर्भात किंवा अन्यही अनुभव जे share केल्याने वाचकांना उपयोग होईल असे अनुभव प्रत्यक्ष ज्या विद्यार्थ्यांनी घेतले ते कमेंट मधे जरूर शेअर करावेत. भारावून जाण्यापेक्षा facts सांगितल्यात तर अनेक जणांना उपयोगी ठरतील.)
जानेवारीमध्ये खूप उशिरा Ekit मिळालं. मग त्याची assembly. आता गाडी चालायला लागणार अशा टप्प्याला आणि प्रत्यक्ष स्पर्धेला आठ दिवस बाकी असताना त्यामधला एक पार्ट खराब झाला. दोघे पुण्याला जाऊन आले पण तिथेही तो दुरुस्त झाला नाही. मग दोघे जण बेंगलोरला जाऊन काम करून आले. महिंद्रा इलेक्ट्रिक कडून चांगलं सहकार्य लाभले. स्पर्धेला निघायच्या आदल्या दिवशी काँलेजच्या वर्कशॉपमधून एका मुलीची sack चोरीला गेली. प्रवासाची सर्व तिकिटे, थोडे पैसे, तिचे एटीएम कार्ड सगळे त्यात होतं. पूर्ण कॉलेज शोधलं. sack मैदानाच्या बाजूला एका झुडपात सापडली. सगळी तिकीटं पण तुकडे तुकडे करून तिथेच टाकलेली होती. सगळे तुकडे गोळा केले आणि jigsaw puzzle जोडावे तसे जोडले. तो दिवस आणि रात्र मात्र टेन्शनमध्ये गेली. कॉलेजमधल्याच कोणीतरी ते कृत्य केलं होतं हे नक्की. समाजात अशा विकृत शक्ती असतात आणि आपण कायम सजग राहून त्यांना तोंड दिले पाहिजे हे आम्ही शिकलो.
प्रत्यक्ष स्पर्धेतले अनुभव विलक्षण आहेत. इलेक्ट्रिक व्हेईकल बद्दलच्या अपुऱ्या ज्ञान आणि माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अपेक्षा पूर्ण करताना चांगलीच दमछाक झाली. पण  Problem Solving on the spot चा चांगला अनुभव मिळाला. Kill switch साठी relay वापरून एका रात्रीत बनवलेलं सर्किट असो किंवा साधा जुना फ्यूज वापरून बनवलेले HVDC (High Voltage Disconnect) असो, गटकार्याचा तो एक उत्तम नमुना होता. अगदी शेवटच्या टप्प्यात काहीही झालं तरी शेवटपर्यंत give up करायचं नाही असं दोन जणींनी ठरवलं आणि सगळी टीम काम करत राहिली. तो प्रसंग तर आजही तसाच्या तसा डोळ्यासमोर उभा आहे. दुसरीकडे टीम मधल्या चार पाच जणींनी मिळून केलेल्या डिझाईनचे उत्तम प्रकारे प्रेझेंटेशन केलं आणि त्याआधारे टीमला “Best in CAE (Computer Aided Engineering)” चे बक्षीसही मिळाले.
बक्षीस मिळाल्याचा आनंद तर झालाच. तो साजरा पण केला. पण त्याचा फायदा असा झाला की सगळी टीम खूप आत्मविश्वास घेऊन परत आली. मुली काय गाडी बनवणारअसं म्हणणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली. पण त्याहून मोठा फायदा झाला की त्यावेळी पहिल्या दुसऱ्या वर्षाला असलेले विद्यार्थी प्रेरित झाले. baja आणि तश्या अन्य स्पर्धांमध्ये भाग घ्यायची परंपरा परत सुरु झाली.
या टीम मधल्या चार मुलींनी पुढे त्यांच्या शेवटच्या वर्षाचा प्रकल्प पण wheel end design, त्यासाठी Aluminum Alloy चा वापर, testing, validation यावर केला. स्पर्धेपलीकडे जाऊन त्या मुलींनी खूप काम प्रोजेक्ट म्हणून केलेलं होतं. तरी स्पर्धेला विरोध म्हणा किंवा स्वतःचे महत्त्व वाढवण्यासाठी म्हणा ...हा प्रकल्पच कसा वैध नाहीये असा मुद्दा विभागाच्या मीटिंगमध्ये एका वरिष्ठ प्राध्यापकांनी लावून धरला. हे ऐकून मग मात्र माझा पेशन्स संपला. त्या मीटिंगमध्ये मग जोरदार खडाजंगी झाली. गंमत म्हणजे याच प्रोजेक्टला TCS कडून मिळणारं ‘Best Project’ चं मानाचं बक्षीस नंतरच्या आठ-दहा दिवसात जाहीर झालं.
२०१८ च्या स्पर्धेसाठी टीम तयार झाली होती. आता स्पर्धेच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रिक व्हेईकल म्हणून आम्ही जास्त विचार करायला लागलो. बॅटरीची क्षमता, charging- discharging चा rate असे इलेक्ट्रिकल मधले मुद्दे आणि इलेक्ट्रिक व्हेईकल ला multi speed gear box गरजेचा आहे का, असेल तर ratio कसे ठरवायचे असे मेकॅनिकल मधले मुद्दे यावर अगदी संशोधन नाही पण बराच विचार डिझाइन करताना करत होतो. स्पर्धेसाठी लागणारी  आर्थिक मदत परदेशातून माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कातून मिळत गेली. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी आम्ही वापरलेला gear box बघून अनेक जणांच्या माना वाकड्या झाल्या. पण स्पर्धेमधला  sledge-pull नावाचा प्रकार फक्त आम्हीच पूर्ण केल्यावर हीच मंडळी आमची गाडी बारकाईने बघायला आली.


पुढच्या वर्षी अनेकांनी तसाच गिअर बॉक्स वापरलेला बघितला तेंव्हा आम्ही बरोबर विचार करत असल्याची पावती मिळाली.
या स्पर्धेमध्ये मार्केटिंग प्रेझेंटेशनचं पहिलं बक्षीसही टीमला मिळालं. वालचंद मधली मुलं soft skills मध्ये पुण्या-मुंबईच्या मुलांच्या तुलनेत मागे पडतात असे अनेक वर्षे ऐकत होतो. थोडे कष्ट घेतले, भाषेवर प्रभुत्व मिळवलं, उत्साहाने बोललं आणि त्यात अंगभूत तांत्रिक ज्ञान मिसळलं की soft skill च्या या बागुलबुवावर मात करता येते हे नेमकेपणाने कळले. (वालचंद मधे शिकलेल्या अनेकांना हा अनुभव असेल, बाहेरच्या जगात 'सांगलीच्या काँलेजमधे शिकलेला ' असं सुरवातीला ऐकायला लागलं तरी नंतर आपण techical ज्ञानात कमी नसतो फक्त वरवरची चमक मिळवली की झालं)
या टीममध्ये तेंव्हा second year ला असलेले चार जण होते. त्यातल्या एका मुलानं पुढच्या वर्षीची Ebaja टीम तयार करायचे ठरवले. पण विशेष म्हणजे त्यातल्या एका मुलीने MBaja साठी टीम तयार करायचा निर्णय घेतला. हे विशेष अशासाठी की आत्तापर्यंत ही स्पर्धा खूपच अवघड झाली होती. स्पर्धेसाठी बनवलेले ट्रॅक बघून यावर गाडी चालू शकते यावर विश्वास बसत नाही (इच्छुक वाचकानी youtube वर त्याचे व्हिडिओ जरूर पहावेत). अशी अवघड स्पर्धा बघितल्यावर त्या मुलीला ते आव्हान स्वीकारावंस वाटलं हे कौतुकास्पद. अनेक सीनियर विद्यार्थ्यांनी विरोध करूनही ती ठाम राहिली. बरोबर तिची जिवलग मैत्रीण होती पण त्या वर्गातल्या मुलांनी पण तिला साथ द्यायचं ठरवलं हे खूप आनंददायी होतं.
२०१९ साठी मग दोन टीम तयार झाल्या. ५० विद्यार्थी आता हा अनुभव घेऊ शकणार होते. त्याबरोबरच efficycle आणि go-kart नावाची अजून एक स्पर्धा असे मिळून जवळजवळ सगळे विद्यार्थी आता या परंपरेचे पाईक झाले.
दोन्ही संघांसाठी मिळून बराच खर्च येणार होता. पण पुरेसं आधीपासून नियोजन करून तो प्रश्न आधीच मार्गी लावला. त्यामुळे टेक्निकल गोष्टींवर काम करायला टीमला स्वातंत्र्य मिळाले. Ebaja साठी, अतिशय हलका आणि छोटा, 2-speed gear box स्वतः डिझाईन करून बनवण्याचे आव्हान मुलांनी स्वीकारलं आणि खूप खूप कष्ट घेऊन त्यात यश मिळवलं. सगळ्या प्रक्रियेत पुस्तकात शिकलेल्या अनेक विषयांचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. दुसरीकडे MBaja मध्ये engine-CVT–gearbox-drive shaft यांची योग्य assembly आणि tuning यावर काम केलं गेलं. दरवर्षी टप्प्याटप्प्यानं गाडी अधिक उत्तम आणि हलकी, तरी मजबूत बनत होती. उदाहरणार्थ २०१७ मधली ३८० किलो वजनाची गाडी २०१८ मधे २८० किलो आणि २०१९ मध्ये २०८ किलोची झाली.

इंदूर आणि रोपर (पंजाब) येथे झालेल्या स्पर्धा नेहमीप्रमाणे रोमहर्षक झाल्या. नवनवीन समस्या आणि त्यांना आयत्या वेळी काढलेली उत्तरं हा तर या स्पर्धांचा आत्मा. रोपरच्या स्पर्धेवेळी स्पर्धेच्या पहिल्या दिवशी steering rack तुटला. रोपरसारख्या छोट्या गावात तसाच rack मिळणं शक्य नव्हतं. पण पुढच्या चार-पाच तासांत most suitable rack मिळवून त्यासाठी गाडीमध्ये योग्य ते बदल करून परत गाडी चालती करणे किंवा एका हाताला टाके पडलेले असताना टीमची गरज म्हणून एका हाताने हाताने brake bleeding चं काम करणारा विद्यार्थी हे विशेष लक्षात राहिले.
बक्षीस न मिळवता परत येऊनही पुढच्या टीम तयार झाल्या आहेत. यावरून आता बक्षिसापेक्षा हे अनुभव घेण्याची गरज आणि महत्त्व सर्व मुलांना पटले आहे हे जाणवतंय.
मार्च २०१९ पासून मी मात्र ह्या सगळ्या पासून जाणीवपूर्वक लांब राहिलो आहे. पण सहकारी शिक्षक मैदानात उतरले आहेत. थोड्याच दिवसात त्यांना पण हे व्यसन लागेल. विद्यार्थी तर आहेतच. अनुभव शिक्षणाची ही खाण खोल-खोल खणली जाईल हे नक्की!
यात चांगली गोष्ट अशी आहे की सोन्याच्या किंवा दगडांच्या खाणी संपतात..पण वाचलंदच्या विद्यार्थ्यांना सापडलेली ही अनुभवांची खाण मात्र खोल खोदत जातील तसे अधिक गवसेल अशी आहे.
खरंतर भावनिक होऊन बोलणे हा माझा स्वभाव नाही, पण ठरवून या स्पर्धांमधून बाजूला झालो तरी घेतलेले अनुभव मात्र आता कायमचे चिकटले आहेत. या सगळ्या प्रक्रीयेचा मी एक भाग होतो हे आठवूनही आज समाधान वाटतंय. कधी शिकवलेले, वाद घातलेले, माझा ओरडा खाल्लेले, कधी शाबासकी मिळवणारे तर कधी चक्क रडणारे अनेक विद्यार्थी आज आठवून जातायत. काही प्रसंग मनावर कोरले गेलेत, काही इथे लिहायचे निसटलेत. चालायचंच. मी काही लेखक नाही, शिक्षक आहे. आज राहिले, विसरले ते उद्याच्या तासाला आवर्जून सांगायचे हाच शिरस्ता होता. गेल्या दहा वर्षात जे अनेक इंजिनिअर झाले त्यातले काही चांगले इंजिनिअर घडवण्यात माझा पण सहभाग होता याचा आनंद आहे.

अमर परांजपे  

Sunday, May 24, 2020

भाग १९ - Efficycle ची नव्याने सुरुवात

     विभागामधील बदललेलं वातावरण, अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मुलांनी वेळ वाया घालवू नये अशा मताचे शिक्षक, त्यामुळे मुलांमध्ये पसरलेला निरुत्साह आणि अंतिम वर्षात विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा यांच्याकडे वाढलेला ओढा  अशा सगळ्या कारणांमुळे Baja आणि efficycle मध्ये सहभागी व्हायची परंपरा २०१४ -१५ या वर्षात खंडीत झाली. पण निखारा पूर्णपणे विझलेला नव्हता. थोडी धुगधुगी शिल्लक होती. सुरुवातीपासूनच आधीच्या टीमने पुढची टीम तयार करायची, त्यासाठी जुनियरना प्रेरित करायचं, त्यांची निवड करायची अशी पद्धत पडलेली होती. टीमने मिळवलेले बक्षीस पुढची टीम तयार होण्यासाठी जास्त उपयोगी पडायचे. मार्च-एप्रिल २०१५ मध्ये कोणीतरी या धुगधुगी शिल्लक असलेल्या निखाऱ्यावर फुंकर घातली, नेमकी कुणी हे  माहिती नाही पण माझेच कोणीतरी सहकारी शिक्षक असावेत. त्यावेळी second year पूर्ण करून third year मध्ये जाणाऱ्या वर्गात मग थोडा उत्साह आला. अंतिम वर्षातले कोणी फारसे उत्सुक नव्हते. त्यामुळे third year मधल्या विद्यार्थ्यांची टीम  बनायला लागली. फक्त third year मधल्या मुलांना जमेल का अशी शंका माझ्या मनात होती. पण आता पेटलेला निखारा विझू द्यायचा नव्हता. त्याच वेळी अंतिम वर्षातले दोन जण भेटायला आले. पुरेसे उत्साही होते. त्यांना आधीची दोन वर्षं शिकवलेलं असल्यामुळे माहितीचे होते. मग ते दोघं आणि तिसऱ्या वर्षातले आठ जण अशी टीम तयार झाली.
स्पर्धा दरवर्षी अधिकाधिक कठीण होत होती. सायकल डिझाईन करायला जास्तीत जास्त अवघड होईल असे बदल नियमात केले जात होते. उदाहरणार्थ २०१५ च्या स्पर्धेसाठी पुढे दोन चाकं आणि मागे एक चाक अशी रचना कंपल्सरी होती. तसेच दरवर्षी एका थीमला प्राधान्य दिलं जात होतं. २०१५ ला कमीत कमी वजन ह्याला प्राधान्य होतं. एका वर्षाचा खंड पडल्यामुळे  टीममध्ये अनुभवी कोणी नव्हतं आणि स्पर्धा जास्ती कठीण होऊ लागली होती. वालचंदकडे बघून आता आजूबाजूच्या कॉलेजमधून पण अशा स्पर्धांमध्ये सहभाग वाढायला लागला होता. त्यामुळे चार टीमच्या सायकल एकत्र करून एका मोठ्या टेम्पो मधून स्पर्धा ठिकाणा पर्यंत पाठवता येणार होत्या.
स्पर्धेचे ठिकाण चंदीगड मधून बदलून जालंदर च्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (LPU) मध्ये गेलं होतं. प्रवासातल्या अडचणी लक्षात घेऊन स्पर्धेच्या ठिकाणी किमान २४ तास आधी पोहोचायचं नियोजन करायला सुरुवात केलेली होती. मुलं पोहोचली. आम्ही दोन दिवसांनी प्रत्यक्ष स्पर्धेच्या दिवशी पोहोचणार होतो. टेम्पोही वेळेपूर्वी पोहोचला. सायकल उतरवताना लक्षात आलं की प्रवासादरम्यान आदळून आदळून सायकलला बऱ्यापैकी इजा पोहोचलेली आहे. LPU पासून जालंदर दहा-बारा किलोमीटर. तिथली दुकानं शोधून, योग्य ते पार्टस आणून एका दिवसात सगळ्यांनी मिळून सायकल दुरुस्त केली. पण मागच्या बाजूला वापरलेले विशिष्ट चाक तिथे मिळेना. सांगलीमध्ये टीम मध्ये नसलेल्या दोघांनी ते विकत आणलं आणि दुसऱ्या दिवशी जाताना मी विमानातून ते घेऊन गेलो. 
या स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केल्यावर आणखीन एक केलं होतं. बनवायच्या गाडी किंवा सायकल मधला काही आव्हानात्मक भाग शेवटच्या वर्षातली मुलं प्रकल्पासाठी घेत होती. यावेळी पण एका गटाने सायकलच्या ट्रान्समिशन डिझाईनवर प्रकल्प केलेला होता. त्यानुसार नवीन इलेक्ट्रिक मोटर विकत घेतलेली होती. पण महागडी लिथियम आयन बॅटरी घ्यायला जमले नाही. ते काम २०१६ मध्ये केले. अशी दरवर्षी टप्प्याटप्प्याने प्रगती करत होतो.


स्पर्धा छान पार पडली. शेवटच्या रेस दरम्यान steering joint तुटला. पण फक्त पाच ,दहा मिनिटात वेल्डिंग करून सायकल परत पळायला लागली होती. शर्यत संपली आणि एकदम ज्या ज्या संघांनी स्पर्धा पूर्ण केली होती त्यांच्या सायकली संयोजकांनी ताब्यात घेतल्या. प्रत्येक सायकलची कसून तपासणी केली. आमच्या इलेक्ट्रिक मोटर बद्दल त्यांना संशय आला. त्यामुळे परत सगळी तपासणी झाली. काय झालं कळत नव्हतं. बक्षीस मिळणार नाही म्हणून हताश झालेला एक जण थोडा चिडून मला म्हणाला, “ सर, बाकी टीम सगळे नियम पाळत नाहीत. इथेही त्यांना अडवले जात नाही. तुम्ही सगळे नियम पाळायला लावता. त्यामुळे सायकल जड होते. पळत नाही आणि मग बक्षीस मिळत नाही.मी काहीच बोललो नाही. थोड्याच वेळात बक्षीस समारंभ सुरू होणार होता.
यावेळी स्पर्धेसाठी कॉलेज कडून परवानगी मागताना आणि विशेषतः TEQIP च्या ग्रांट मधून पैसे मागताना बराच वाद झाला होता. काही लोकांच्या पोटात दुखत होतं. मग फक्त १० मुलांसाठी एक लक्ष रुपये कसे खर्च करणार वगैरे मुद्दे आले... दुसरे कोणी मागत असतील तर त्यांना द्या पण बाकी कोणी मागत नसतील तर ज्या मुलांनी मागितले आहेत त्यांना दिले पाहिजेत अशी आम्ही भूमिका घेतली होती. त्यामुळे कॉलेजमध्ये काही लोक टीमला बक्षीस मिळू नये म्हणून देव पाण्यात घालून बसले होते.( इथे कदाचित काहींना माझ्या सडेतोड लिखाणाचा राग येईल,पण इलाज नाही. जे घडले तेच मी लिहितोय.)
बक्षीस समारंभ चालू झाला. ज्या एका टीमने अनेक ठिकाणी चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि शेवटची रेस पण जिंकली होती त्यांचं नाव घेतले जात नव्हतं. आमची आणि त्यांची इलेक्ट्रिक मोटर सारखी दिसणारी होती आणि त्यावर संशय पण घेतला गेला होता. मग काय.. संपलंचं की! एकेक बक्षीसं देत खूप आदराचं मानलं जाणारं बेस्ट डिझाईनचे बक्षीस जाहीर करायची वेळ आली. बक्षीस जाहीर करणाऱ्यानं उत्सुकता ताणण्यासाठी “Its team from Maharsahtra” असं  सांगितलं तरी आम्हाला वाटलं की COEP किंवा पुण्यातल्या कुठलं तरी कॉलेज असेल. पण नाही टीम आर्यन वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीरिंग सांगलीहे शब्द कानावर पडले. मग त्या भल्यामोठ्या ऑडिटोरियम मध्ये मागे कुठेतरी बसलेल्या आमच्या टीम मधले सगळे पळत स्टेजवर.
मजा आली. काही देवांना आता पाण्यातच राहावं लागणार होतं. बाहेर आल्यावर मघाशी चिडून बोलणाऱ्या त्या विद्यार्थ्याला म्हटलं, “काय मित्रा, आता काय म्हणतोस?” हाच मुलगा पुढे खूप चांगला मित्र झाला. आजही आहे. कॅम्पस प्लेसमेंट मधून नोकरी मिळाली नाही तरी स्वतःच्या हिमतीवर बाहेरून त्या तोडीची नोकरी मिळवताना efficycle मधल्या अनुभवाचा उपयोग झाल्याचं  अजूनही सांगत असतो. २०१६ च्या सप्टेंबर मध्ये भेटायला आला होता. सर, सगळे नियम पाळून पहिल्या पगारातून तुमच्यासाठी गिफ्ट आणलं आहे.आजही रोज सकाळी त्याने दिलेल्या कॉफी मग मधून कॉफी पिताना मला हे सगळे प्रसंग आठवतात.
२०१५ मध्ये efficycle ला पुन्हा सुरुवात झाली. आज अखेर त्यात खंड पडलेला नाही. अडचणी येत होत्या पण त्यावर मात करायची शक्ती पण मिळत होती. त्याच दरम्यान Efficar नावाची आणखीन एक स्पर्धा सुरू झाली. यात BTech बरोबरच MTech करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला परवानगी होती. जानेवारी 2016 मध्ये चंदीगडला ही स्पर्धा झाली. ठरवून ठेवलेल्या टेम्पोला दोन दिवस आधी अपघात झाला. त्यावेळी जाधव सरांचे ओळखीतून दुसरा टेम्पो मिळाला. टेम्पो चालक आणि मालक श्री राजू बिराजदार यांच्याशी चांगलाच स्नेह जुळला. त्यानंतरच्या कित्येक  स्पर्धांच्या वेळी राजूकडे गाडी सोपवली की आम्ही निर्धास्त असायचो.  टीममधले सदस्य असल्यासारखा त्यांचा सहभाग असायचा. ह्या Efficar स्पर्धेतही टीमला बेस्ट डिझाईनचे बक्षीस मिळाले.
वर्गात machine design शिकवणाऱ्या माझ्यासारख्या शिक्षकाला अजून काय पाहिजे. या सायकल design करतानाचे अनेक किस्से त्याच्या technical बाजू सकट वर्गात सांगत होतो. त्यालाच management मधे case study म्हणतात हे नंतर कळले!
      या सगळ्या स्पर्धांसाठी बराच मोठा खर्च यायचा त्यातला मोठा भार कॉलेजच्या TEQIP च्या grant मधून मिळायचा. पण त्यासाठी आवश्यक प्रस्ताव लिहिणे, तो सादर करणे, ऑफिस ऑर्डर काढून घेणे, हिशोब ठेवणे, पावत्या जमा करणे हा बराच मोठा उपद्व्याप असायचा. विद्यार्थ्यांचे आणि माझेही चांगले प्रशिक्षण होत गेले. प्रत्येक स्पर्धेचा हिशोब खूप काटेकोर ठेवला पाहिजे यावर माझा कटाक्ष असायचा. त्यासाठी एक्सेल मध्ये केलेला format खूप उपयोगी पडत होता. आजही कुठल्याही स्पर्धेमधलं हिशोबासंबंधित काहीही विचारलं तरी मी संगणक बघून काही मिनिटात उत्तर देऊ शकतो. अर्थात टीममधल्या हिशोब ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांनी पण त्यासाठी बरेच कष्ट घेतले आहेत.
२०१६ चे efficycle स्पर्धेवेळी नेमकी NBAची कमिटी कॉलेजमध्ये यायची होती. मी खुपदा विचारुनही संचालकांनी परवानगी दिली नाही. अन्य कोणीही जाऊ शकले नाही. त्यामुळे आजही त्या टीममधले विद्यार्थी थोडे चिडून आहेत. तुम्ही आला असतात तर बक्षीस मिळालं असतंयाला काय उत्तर देणार.
पण बरोबर कोणी शिक्षक नसताना घेतलेला स्पर्धेचा अनुभव, गट म्हणून केलेली सगळी धडपड त्यांना जास्ती उपयोगी पडेल हे नक्की. त्यानंतर थोड्याच दिवसांनी Efficar ची दुसरी स्पर्धा झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने आणखी गोष्ट झाली. पहिल्यांदाच किंवा खरंतर आत्तापर्यंत एकदाच, एका मुलीनं ड्रायव्हरचं काम केलं.
पण  त्यावेळी प्रत्येक ठिकाणी टीमचा परफॉर्मन्स उत्तम होऊनही एकही बक्षीस मिळाले नाही. आम्हालाच नाही तर इतर टीमना पण ह्याचे आश्चर्य वाटत राहिले. पंजाब मधल्याच संघांना बक्षीस देण्याचा प्रकार नंतर लक्षात आला. मग संयोजकांकडे यासंबंधी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हे सगळं सुरु असताना विभागामधून होणारा त्रास , अडवाअडवी, विरोध हे सगळं सुरु होतंच. पण ते सगळ्यांनाच सरावाचं झालं होतं. उशिरापर्यंत workshop मधे काम करायला परवानगी न देणे हे सगळ्यात त्रासदायक. एक दोन वेळा तर कॉलेजचं workshop असताना बाहेर काही काम करावं लागलं. २०१४ मधेच कॉलेजने AICTE कडे एक प्रस्ताव पाठवलेला होता. “Learning Factory”, म्हणजे नीती आयोगच्या Atal Tinkering Lab किवा Makers space च्या धर्तीवरप्रयोगशाळा उभी करण्याचा हा प्रस्ताव होता. २०१६ पर्यंत तो प्रस्ताव मंजूर झाला नाही. मग कॉलेजने स्वतःच अशी प्रयोगशाळा उभी करण्याचं ठरवलं आणि अचानकपणे त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. कमीतकमी खर्चात पण विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल अशी प्रयोगशाळा उभी करायची होती. जागा शोधली, ताब्यात घेतली, किरकोळ दुरुस्ती आणि light ची व्यवस्था करून घेतली. कुठलीही साधनं नव्हती. पण टीम मधल्या विद्यार्थ्यांना हक्काची जागा झाली. सुदैवाने २०१७ मधे AICTE कडून ४३ लक्ष रुपयांना मंजुरी मिळाली. मग 3d printer सारखी सुविधा पण उपलब्ध झाली.  
२०१७ चं efficycle वेगळा अनुभव देणारं ठरलं. नेहमीप्रमाणे २०१६ च्या टीमने पुढची टीम निवडली. टीम कामाला लागली. मे महिन्यापासून अखंड काम चालू होतं. ह्यावेळ पर्यंत हळूहळू बदल होत सगळी टीम तिसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांची झालेली होती. या टीमने एक अनोखा पण फार चांगला उद्योग केला. प्रकल्पासाठी आर्थिक मदत मागणारा प्रस्ताव त्यांनी काँलेजच्या माजी विद्यार्थ्यांना फेसबुक, ईमेल या माध्यमातून पाठवला. १९७७ ते १९८१ च्या बँचमधील माजी विद्यार्थ्यांनी या प्रस्तावाला उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि  मोठी रक्कम त्यातून उभी राहिली.  माझ्याबरोबर दुसरे faculty advisor म्हणून electrical department चे प्रमुख असलेले डॉ. मोरे सर सहभागी झालेले होते. मग तिथून पुढे सगळे प्रस्ताव, बीलं इत्यादी कागद HoD, Electrical ह्यांचे मार्फत पुढे जायला लागले. mechanical विभागाकडून होणाऱ्या त्रासाला असा वळसा दिला गेला.  अर्थात मोरे सरांचं अन्य तांत्रिक मार्गदर्शन पण महत्त्वाचं होतंच. आमच्या विभाग प्रमुखांनी ह्यावरून बराच गोंधळ करायचा प्रयत्न केला. पण Multi-disciplinary project असल्यामुळे कुठल्याही एका विभाग प्रमुखांची सही पुरेशी ठरत होती. मग विद्यार्थ्यांना त्रास द्यायचे प्रयत्न सुरु झाले. टीम म्हणून हा त्रासही सगळे आनंदाने झेलत होते. एका विद्यार्थ्याने ह्या सगळ्या प्रकाराला “work hardening” असे नाव दिले होते. (तांबे किंवा पितळ्याला मजबुती येण्यासाठी ठोके देतात ना)! एकदा तर workshop मधे काम करणाऱ्या एका सहशिक्षकावर दबाव टाकून  माझ्या विरुद्ध खोटी तक्रार द्यायला लावली गेली. अर्थात मी पण एव्हानी तयारझालेलो होतो!!
तर efficycle २०१७. स्पर्धेच्या खूप आधी सायकल तयार होती. २०१५ मधे १७६ किलोअसणारी  आमची सायकल २०१६ मधे १४५ किलोची झाली तर २०१७ मधे वजन १०४ किलो भरलं.
सुरुवातीपासून प्रत्येक गोष्टीचा काटेकोर विचार केला गेला होता. तरी १०० किलोचं उद्दिष्ट गाठायला जमलं नाही (ते २०१८ मधे पूर्ण झाले). प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी पण Saftey checking, brake test, electric test, असं सगळं खूप भराभर पूर्ण होत गेलं.

ह्यावेळी नव्याने सुरु केलेल्या
electric drive excellence test मधे ती सायकल ज्या प्रकारे चालवली, पळवली, वळवली ते बघून सगळेच आश्चर्य चकित झालेले.
ह्या टीमने इतर अनेक संघाना खूप मदत केली. अनेक नवीन संघ त्यामुळे अंतिम स्पर्धेमध्ये पोचू शकले. देशभरातल्या अनेक प्राध्यापकांची ह्या निमित्ताने ओळख झाली. विद्यार्थ्यांनी आग्रह केल्यामुळे मी
“Best faculty advisor” साठी मुलाखत दिली. गप्पांच्या स्वरूपात झालेली ही मुलाखत खूपच छान झाली होती. शिक्षक किंवा मार्गदर्शक म्हणून काय आणि कसं काम केलं आणि किती सातत्यानं काम केलं हे जाणून घ्यायची त्यांची इच्छा होती. एकंदर स्पर्धेविषयी माझी मत मांडायला चांगली संधी मिळाली. स्पर्धा उत्तम पार पडली. टीमचा नंबर ४४ होता आणि बक्षीस समारंभात ४ वेळा व्यासपीठावर जायची संधी मिळाली. मलाही “Best faculty advisor” साठीचा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला. गंमत म्हणजे ४ बक्षीसं मिळूनही टीम आनंदी नव्हती. एकुणात तिसऱ्या नंबरचं बक्षीस फक्त ७ गुणांनी हुकल्याचं दुःख जास्ती होतं.

२०१७ मधे ४ बक्षिसं मिळाली आणि २०१८ मधे एक पण नाही. त्याने काहीच फरक पडला नाही. त्या त्या वेळी तात्पुरता आनंद किंवा दुःख झालं, नाही झालं असं नाही. पण सहभागी विद्यार्थ्यांचं झालेलं अनुभव शिक्षण त्याच तोलामोलाच होतं. राष्ट्रीय पातळीवर आपला कस तपासून बघायला मिळाला. इतर विद्यार्थी काय काय करतात हे पाहायला मिळालं. आपल्यातल्या उणीवा समजल्या. कॉलेजमधल्या उर्वरित एक वर्षामध्ये त्यावर काम करायला वेळाही उपलब्ध आहेच.

कॉलेजचा विचार केला तर विद्यार्थ्यांनी अशा अनेकानेक स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, त्यातून वेगवेगळे अनुभव घ्यावेत, त्या आधारावर स्वतःमधल्या engineer ला अजून पैलू पाडावेत हे खूप गरजेचं आहे. भविष्यातही अशी परंपरा चालू रहावी हे सदिच्छा!
अमर परांजपे

Saturday, May 23, 2020

भाग १८ - Efficycle ची सुरुवात

जानेवारी २०११ मध्ये पहिले Baja झालं. टीमला बक्षीस नाही मिळालं पण कॉलेजमध्ये त्याची पुरेशी हवा झाली. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून मिळालेले अनुभव इतके विलक्षण होते की लगेचच पुढची टीम तयार व्हायला लागली. पहिली टीम तयार होताना २५ जण मिळतील का अशी शंका होती तर आता कोण २५  निवडायचे असा प्रश्न पडला. आधीचा अनुभव, तांत्रिक ज्ञान आणि कौशल्य अशा काही कसोट्या लावून २५ जणांची टीम तयार झाली. पुढचा वादाचा मुद्दा आला की संघाचा कप्तान कोण? पहिली टीम तयार होताना असा काही वाद झालाच नव्हता. किंवा झाला असला तरी आमच्या पर्यंत आलेला नव्हता. (नंतरही २०१९ पर्यंत जवळ जवळ वीस टीमबरोबर अशा वेगवेगळ्या स्पर्धांसाठी काम केलं पण कप्तान पदावरून कधीच वाद झाला नाही.) यावेळी कप्तान व्हायला दोघे उत्सुक होते. दोघेही तुल्यबळ होते. जवळजवळ आठ दिवस यावर चर्चा, भांडणं चालू होती. निर्णय घेणं आम्हाला दोघांनाही अवघड वाटत होतं. शेवटी लोकशाही पद्धतीने निर्णय घेतला आणि एकाचं नाव कप्तान म्हणून जाहीर केलं. पण लगेच दुसरा इच्छुक उमेदवार आणि त्याच्या बरोबर आणखीन दोन तीन लोकांनी संघातून बाहेर पडत असल्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांमध्ये इतकं टोकाचं राजकारण किंवा गटबाजी बघून त्या दिवशी मी खूप उदास झालो होतो.
पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच! दुसऱ्या दिवशी हेच तीन चार जण भेटायला आले तो एक नवा प्रस्ताव घेऊनच. त्याच्या आदल्या वर्षीच SAE च्या उत्तर भारत विभागाने एक स्पर्धा सुरू केलेली होती. Efficycle. स्पर्धेचे स्वरूप साधारण Baja सारखंच . पण तयार करायचं वाहन वेगळं, म्हटलं तर सोपं आणि म्हटलं तर अधिक आव्हानात्मक. एकावेळी दोघे बसू शकतील आणि चालवू शकतील आणि त्याशिवाय इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने पण चालू शकेल अशी तीन चाके असलेली सायकल डिझाईन करून बनवायची- Hybrid Electric Tandom Tricycle! टीम ८ च विद्यार्थ्यांची. तर ह्या स्पर्धेत भाग घ्यायचा प्रस्ताव घेऊन ही मंडळी आली होती. हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता आणि खरंतर मला राहवलंही नाही. विद्यार्थ्यांमधल्या भांडणं, गटबाजी, किंवा राजकारणाचं हे पॉझिटिव्ह रूप! यातून Efficycle नावाच्या नवीन पर्वाचा प्रारंभ झाला.
स्पर्धेचे स्वरूप आणि संरचना Baja सारखेच असल्याकारणाने थोडा अनुभव गाठीशी होता. पण स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होत असल्याने वेळ कमी होता. टीममध्ये इलेक्ट्रिकल मधल्या  एका विद्यार्थ्याचाही समावेश झाला होता. स्पर्धेचा आवाका थोडा छोटा असल्यामुळे म्हणा किंवा वेळ आणि पैसे वाचावेत म्हणून म्हणा काही चांगले बदल केले होते. पहिली फेरी, म्हणजे ज्यामध्ये प्रत्येक टीमने आपले डिझाईन प्रेझेंट करायचे असते ती फेरी, ऑनलाइन होणार होती. स्मार्टफोन, 4जी इंटरनेट कनेक्शन असं काही नसताना उचललेले हे पाऊल क्रांतिकारी म्हणावे लागेल. प्रत्येक टीमने आपलं प्रेझेंटेशन ई-मेल करून संयोजकांना पाठवायचं. प्रत्येक टीमला ठरावीक वेळ (time slot) दिलेला होता. त्यावेळी पूर्ण टीमने एकत्र येऊन फोन वरून आपलं डिझाईन प्रेझेंट करायचं. आधी पाठवलेलं प्रेझेंटेशन समितीसमोर असणार होतंच. समोरचा श्रोता दिसत नसताना प्रेझेंटेशन द्यायचं, प्रश्नांची उत्तरे द्यायची हे वेगळं आव्हान अन् अनुभव होता. (आजही zoom आणि google meet च्या जमान्यात ते फार सुखावह नाहीये). पण या संघाकडे उत्साहाबरोबरच खुन्नस मधून आलेली जिद्द पण होती. योग्य जागा, पुरेसा मोठा आवाज असणाऱ्या स्पीकर फोन याची जुळवाजुळव झाली. टेलिफोनिक प्रेझेन्टेशन सुद्धा छान पार पडलं आणि दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली.
या प्रकल्पाची एक गंमत होती. बघणाऱ्याला किंवा ऐकणार्‍याला वाटायचं की काय साधी सायकल तर बनवायची आहे ना, सोपं आहे की. पण सोपं काहीच नसतं. यामध्ये पण खूप तांत्रिक आव्हाने होती. तीन चाकाची रचना कशी, दोन चालक शेजारी शेजारी असावेत की पुढे मागे, मोटर कुठली वापरायची, मोटार कडून चाकापर्यंत power transmit कशी करायची असे अनेक प्रश्न होते. त्यावेळेपर्यंत यो-बाईक सारख्या इलेक्ट्रिक दुचाकी पण मोठ्या प्रमाणात बाजारात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे बॅटरीची क्षमता, मोटरची क्षमता व प्रकार, त्यासाठी लागणारे circuit याविषयी फारशी माहिती कोणाकडेच नव्हती.
अतिशय साधी वाटणारी, नेहमीच्या सायकल सारखी चालवायला सोपी, पुढेमागे बसणारे दोन चालक पुढे एक चाक आणि मागे दोन चाके असं साधं सोपं डिझाईन तयार झालेलं होतं. प्रत्यक्ष मॅन्युफॅक्चरिंग करताना अडचणी येत गेल्या. सगळे मिळून त्या सोडवत गेलो. फक्त पॅडल मारून चालणारी सायकल त्या मनाने पटकन तयार झाली. इलेक्ट्रिकलच्या भागानी मात्र चांगलं दमवलं.
प्रत्यक्ष स्पर्धा होती चंदीगडला. मुंबईमध्ये रेल्वे बदलून प्रवास करायला लागणार होता. हे  एक वेळ ठीक होतं पण बनवलेली सायकल न्यायची कशी हा मोठा प्रश्न होता. स्वतंत्र टेम्पो मधून नेणे शक्य होतं पण खूप जास्त खर्चिक होतं. रेल्वेमधून नेणं हे सगळ्यात स्वस्त होतं पण त्यात बनवलेली सायकल सुरक्षित (मोडतोड यादृष्टीने) राहील का हा प्रश्न होता. मग त्यावर पण तोडगा काढला. बनवलेली सगळी सायकल परत सुट्टी करायची. सगळे सुट्टे भाग bag किंवा बॉक्स  इत्यादी मध्ये भरून रेल्वेतून बरोबर न्यायचे. फक्त सांगाडा luggage कंपार्टमेंटमध्ये द्यायचा. चंदीगड मध्ये जाऊन स्पर्धेपूर्वी सगळी सायकल परत जोडायची. मार्ग मिळाला पण मुंबईमध्ये गाडी बदलायची होती. सांगलीहुन जाणारी गाडी दादर किंवा सीएसटीला जाणार तर चंदीगडची गाडी बांद्रा टर्मिनस वरून सुटणार. सीएसटी ते बांद्रा प्रवास कसा करणार तो सांगाडा घेऊन? पण दोन गाड्यांमध्ये सहा तास वेळ असल्याने काहीतरी मार्ग निघेल असा विश्वास होता.
स्पर्धेसाठी निघायच्या आधी दोन दिवस वेगळीच समस्या समोर आली. टीममध्ये दोन विद्यार्थिनी होत्या आणि कॉलेजच्या नियमानुसार बरोबर कुणीतरी महिला शिक्षिका जाणे आवश्यक होते. हा नियम आम्हाला माहीतच नव्हता. मेकॅनिकल विभागात कोणीच महिला प्राध्यापिका नव्हत्या आणि इतर विभागांमध्ये कोणी जायला तयार होणं शक्य नव्हतं. मग विद्यार्थिनी सोडून इतर सगळ्यांनी जायचं... हे तर खूपच अन्यायकारक. एक तोडगा निघाला की कोणी महिला पालक (शक्यतो मुलींपैकी) बरोबर असाव्यात. पण इतक्या आयत्यावेळी नऊ-दहा दिवसांसाठी जायला कोण तयार होणार? शेवटी एका विद्यार्थ्यांची मोठी बहीण तयार झाली.
विभाग स्तरावर ही समस्या सोडवली. पण तिकडे मा. संचालकांचे म्हणणे वेगळेच. आठ मुलांच्या संघासाठी दोन तर सोडाच पण एका शिक्षकांनी सुद्धा आठ-दहा दिवस कॉलेजमधले  नियमित कामकाज सोडून जायची गरज नाही. विषय संपला. विनंती, चर्चा, वाद हे सगळं करूनही परवानगी मिळाली नाहीच. शेवटी फक्त टीमने स्पर्धेला जायचं ठरलं. सहज विचार करा. छोट्या गावांमधून आलेले विद्यार्थी, महाराष्ट्राबाहेर कधी फारसा प्रवास केलेला नाही, मुंबई पण पाहिली नाही. आणि आता एकदम गाडी बदलून एवढं सगळं समान घेऊन एकदम चंडीगडला जाणार, ते ही राष्ट्रीयस्तरावरच्या स्पर्धेसाठी. एकंदर स्पर्धेपर्यंत पोचणे हीच मोठी स्पर्धा होती.
सायकलचे dismantling, पॅकिंग, लेबलिंग, सगळ्यांचे वैयक्तिक सामानाचे पॅकिंग असं  सगळं झालं. मिरजेला जाऊन luggage बुकिंग झालं. प्रत्यक्ष luggage च्या डब्यात सायकलचा सांगाडा नेऊन ठेवला. मुलांना शुभेच्छा देऊन आम्ही दोघं परत आलो. सगळे सुखरुप चंदीगडला पोचू देत अशी प्रार्थना करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच नव्हतं. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. त्या रात्री प्रचंड पाऊस पडला. कधी नव्हे ते सासवड-जेजुरी त्या टप्प्यात रेल्वे रुळांवर पाणी आल्यामुळे गाडी थांबली. पुढे परत बदलापूर-अंबरनाथला रूळ पाण्याखाली. सकाळी सहा वाजता सीएसटीला पोचणारी आणि सहसा लेट न होणारी महालक्ष्मी एक्सप्रेस त्या दिवशी अकरा वाजता कल्याणला पोचली. चंदिगडसाठीची पश्चिम एक्स्प्रेस बारा वाजता बांद्रा टर्मिनस वरून सुटणार होती. काहीही झालं तरी ती गाडी पकडायला पाहिजे होती. कल्याणला उतरून टॅक्सीने बोरिवलीला जाऊन गाडी पकडता येईल असा अंदाज होता. दोन टॅक्सीवाले तयार झाले. पण रेल्वेचे नियम आडवे आले. सीएसटी साठी नोंदवलेलं luggage कल्याणला बाहेर काढायला नकार दिला गेला. पण ज्यासाठी आधीचे सहा-सात महिने काम केलंय ही स्पर्धा अशी सहजासहजी सोडून तर द्यायची नव्हती. मग मुलांनी अजब निर्णय घेतला. बाकी संघाने सगळं सामान घेऊन बोरवलीला जाऊन गाडी पकडायची आणि दोघांनी मागे थांबून सीएसटीला जाऊन सांगाडा ताब्यात घ्यायचा. सुदैवानं पश्चिम एक्सप्रेस पण उशिरा निघाली त्यामुळे बोरिवलीला सगळ्यांनी गाडी पकडली. मागे राहिलेल्या दोघांचं काय? दुपारी चार वाजतामहालक्ष्मी  रेल्वे सीएसटीला पोचली. पुढे काय? दोघजण रेल्वे अधिकाऱ्यांना जाऊन भेटले. नेमकं काय बोलले त्यांचे त्यांनाच ठाऊक पण संध्याकाळी सात वाजता सुटणाऱ्या पंजाब मेल मध्ये दोन तिकीटं आणि लगेच बुकिंग मिळालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते दोघे दिल्लीला उतरले. सांगाडा घेऊन आयएसबीटी (इंटरस्टेट बस टर्मिनस) ला गेले. चंदिगडला जाणाऱ्या बसच्या टपावर सांगाडा चढवला. सकाळी चंदिगड.. नऊ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी सायकलसह पोहोचायचं होतं. एकीकडून हे दोघे सांगाडा घेऊन आणि दुसरीकडून आदल्या दिवशी पोहोचलेले बाकी सगळे अन्य साहित्य घेऊन असे बरोबर नऊ वाजता पोचले. तिथून पुढे स्पर्धेत भाग घेणं खूप सोप्प वाटलं असणार सगळ्यांना!
इकडे मुंबईमध्ये घडलेला सगळा प्रकार सांगायला संचालकांकडे गेलो. म्हटलं आता तरी जायची परवानगी द्या. यावेळी आम्ही जिंकलो. सरांनी एकदम विमान प्रवासाची परवानगी दिली पण एकसाठीच. दोघांनाही जायचं होतं. मग चक्क toss केला. माझा नंबर लागला. रात्रीच्या बसने मुंबई आणि लगेच सकाळच्या विमानानी चंदिगड असं ठरलं. तोपर्यंत कधी विमानाचे तिकीट काढायची पण वेळ आली नव्हती.( टाटामधे असताना जर्मनीला जाऊन आलेलो पण विमान तिकिट हा विषयच नव्हता तेंव्हा) नवे नवे अनुभव. रात्री बसने निघालो. पहाटे ठाण्याजवळ बस बंद पडली. प्रवासातल्या अडचणी सुरू होत्या तर. सुदैवानं दुसरी बस मिळाली आणि वेळेत एअरपोर्टला पोहोचलो. विमान प्रवास सुरळीत झाला. दुपारी बारा वाजता स्पर्धेच्या  ठिकाणी पोचलो. सकाळी ९ ते १२ मध्ये सायकल पूर्ण तयार करून टीम तयार होती. वा!  This is Walchand spirit !!!
स्पर्धा सुरू झाली. सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच एका टेस्टमध्ये बॅटरी जवळ स्पार्किंग झालं. आता काय?? पण त्या स्पार्क पेक्षा मुलांच्या डोक्यातला स्पार्क मोठा होता. तासाभरात दुरुस्ती झाली. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात दीड तासाची शर्यत होणार होती. म्हणजे सलग दीड तास सायकल चालवणारे चालक पाहिजेत. संघ निवडताना त्याचा विचार केला होता आणि निवडलेल्या दोघांनी सराव पण केला होता.  पण त्यातल्या एकाचा आठ दिवस आधी हात मोडला. प्लास्टरमधला हात घेऊनच तो स्पर्धेसाठी आलेला होता पण सायकल चालवू शकणार नव्हता. बाकी गोंधळामध्ये पर्यायी ड्रायव्हर कोण हा निर्णय झालाच नव्हता. स्पर्धा सुरू झाल्यावर कॅप्टनने जाहीर केलं की पर्यायी चालक तो स्वतः असणार आहे. Captain leading from the front! एकदा नेत्यानं निर्णय जाहीर केला की मग त्यावर चर्चा नाही हा संकेत होताच. पण खरं सांगू का सायकल चालवणे हा माझा पण प्राणप्रिय उद्योग असल्याने  इतर सगळ्यांसारखंच मला पण वाटलं होतं की आपण चालक व्हावं. अर्थात ते शक्य नव्हतं. असो. पुढे प्रत्येकच स्पर्धेवेळी हात शिवशिवत राहिले. पण faculty advisor पडलो ना !!



    स्पर्धा उत्तम झाली. शेवटच्या शर्यतीमध्ये एकदा किरकोळ प्रॉब्लेम झाला पण विशेष नाही. बक्षीस मिळालं नसतं तरी वाईट वाटलं नसतं इतकं या स्पर्धेने सगळ्यांना दिलेलं होतं. त्यामुळे बक्षीस समारंभाला आम्ही औपचारिकता म्हणून बसलो होतो.
पण काय आश्चर्य. Fastest acceleration आणि एकुणात तिसरा क्रमांक अशी दोन बक्षिसे मिळाली. दुधात साखर!!


Baja आणि Efficycle च्या पहिल्या स्पर्धांविषयी सविस्तर लिहिले. स्पर्धामधलं आव्हान, त्यात भाग घेणाऱ्यांमध्ये झालेला बदल आणि त्यांना झालेला फायदा या सगळ्यामुळे दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायची एक परंपरा तयार झाली. २०१२ मधल्या दोन्ही स्पर्धा छान पार पडल्या. त्यावर्षी efficycle मध्ये तीन बक्षिसे मिळाली.
दोन्ही वेळा प्रत्यक्ष स्पर्धेच्या ठिकाणी इनामदार सर गेले होते. त्यामुळे मी जास्त लिहीत नाही. एक मात्र नक्की वालचंद कॉलेज आणि टीम Aaryans हे नाव ह्या स्पर्धांमध्ये आदराने घेतले जायला लागले. efficycle मधे तर दरवर्षी नियमात होणारे बदल हे आमची सायकल बघून, तशी सायकल परत करता येऊ नये म्हणून केले जात होते की काय अशी शंका येण्यासारखे होते. दरवर्षी ही स्पर्धा टप्प्याटप्प्याने अवघड होते आहे आणि सगळ्याच टीम ते आव्हान पेलत आहेत.
२०१२ च्या अखेरीस विभागामध्ये बदलाचे वारे वाहू लागले. या स्पर्धांमध्ये भाग घेऊन काही फायदा नाही असं म्हणणाऱ्या शिक्षकांचा एक गट तयार झाला. त्यामुळे  विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा पण   कमी व्हायला लागली. २०१३ मध्ये फक्त efficycle मध्ये भाग घेतला. २०१४-१५ ह्या शैक्षणिक वर्षात एकाही स्पर्धेत भाग घेतला नाही. पण जे खरंच चांगलं असतं, विद्यार्थी हिताचं असतं त्यांना कुठलीही शक्ती दीर्घकाळ रोखू शकत नाही. विद्यार्थी गटामधली अंतःप्रेरणा या सगळ्या शक्तींवर मात करतेच. २०१५-१६ मध्ये efficycle, १६-१७ मध्ये Baja  आणि अन्य काही स्पर्धांची नव्याने सुरुवात कशी झाली? कॉलेजमधला विशेषतः विभागामधल्या प्रखर विरोधाला तोंड देत, अनेक बक्षिसं मिळवत सगळ्यांनी मिळून ही परंपरा कशी चालू ठेवली याची कथा पुढच्या दोन भागांमध्ये वाचायला आवडेल ना?

(गेल्या भागाच्या शेवटी म्हंटल्याप्रमाणे अनेक आठवणी, किस्से, अनुभव आहेत..पण सगळं वाचणं वाचकांना कंटाळवाणे वाटू शकते. त्यामुळे ज्यांना अधिक भर घालायची आहे ते कमेंटस् लिहून जरूर भर घालू शकतात..या परंपरेतील आणखी काही भाग उद्याच्या भागात )
अमर परांजपे

भाग २१ - वालचंद सोडताना

गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्ह...