Tuesday, May 26, 2020

भाग २१ - वालचंद सोडताना


गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्हे. तेंव्हा वाचकांना कंटाळा येण्यापूर्वी थांबलेलं चांगलं. नाही का?
खरंतर स्वतःसाठी म्हणून लिहायला सुरुवात केली होती.  माझे वालचंदमधले अनुभव मी सगळ्यांसाठी शब्दबद्ध करावेत म्हणून पाठपुरावा करणारी विद्यार्थिनी मैत्रीण वैष्णवी आणि हे लेखन  ब्लॉग रूपात पब्लिश करायचं ठरवल्यावर blog चे होमपेज वगैरे तयार करायला मदत करणारी ऋतुजा आणि  सुरुवातीचे काही भाग बारकाईने वाचून त्यात  सुधारणा सुचवणारा एक विद्यार्थी मित्र आदित्य सर्वांनाच मनापासून धन्यवाद...मी सुचेल तसं लिहित जायचो ,त्यामुळे लेखाचा आशय मला किंवा काँलेज संबंधित कुणी वाचला तर समजेल असा असायचा .पण बाहेरच्या कुणी हे लेख वाचले तर संदर्भ लागतील असे नव्हते. शिवाय अनेकदा माझं लेखन complecated  व्हायचं. संयुक्त वाक्यं व्हायची.  मग प्रत्येक भाग बारकाईने वाचून त्यात सुटसुटीतपणा, सोपेपणा आणण्याचं आणि वाक्यरचना , शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त करण्याचं काम न कंटाळता प्राची करते आहे .त्यामुळे हे सगळे लेख वालचंद कॉलेजचा संदर्भ नसणाऱ्यांना सुद्धा वाचनीय वाटत राहिले. अनेकांनी लेखन आवडत असल्याचा प्रतिसाद दिला तर काहींनी त्यांच्या आठवणी, अनुभव यांची जोड कॉमेंट मधून दिली. त्यामुळेच खरंतर सलगपणे इतके दिवस लिहीत राहायचा उत्साह टिकला. हे सगळे लेखन हे त्या त्या अनुभवांच्या, मनातल्या आणि स्मरणातल्या नोंदींवरून करत होतो. रोज दैनंदिनी वगैरे लिहिण्याएवढा मी consistent नाही(दैनंदिनी लिहायची
सवय अलिकडे  लावून घेतो आहे)  इतर अनेकांप्रमाणे अनुभव किंवा प्रयोगांचे डॉक्युमेंटेशन करण्याबाबत मी पुरेसा आळशी आहे. त्यामुळे कुठल्याच अनुभवांच्या लिखित नोंदी नाहीयेत. त्यामुळे कदाचित काही तपशील चुकले असतील. तसेच लेखन त्यादिवशी सुचेल त्या विषयावर झालेले आहे. म्हणावी तशी सलगता नाही. पण त्यामुळेच प्रत्येक भाग स्वतंत्रपणे वाचनीय झाला असावा.
वालचंद मध्ये अनेक सहकारी लाभले. काही दीर्घकाळ तर काही कमी कालावधी करता. काही खूप चांगले मित्र झाले, तर काहींबरोबर टोकाचे वादही झाले. पण या सगळ्यांकडूनच मी खूप काही शिकलो. त्यांनी वालचंद सोडल्यावर किंवा आता मीही वालचंद सोडल्यावर.. त्यापैंकी बऱ्याच जणांशी संपर्क टिकून आहे. खरंतर या सगळ्या सहकाऱ्यांबद्दल लिहायचं राहून गेलंय याची जाणीव आहे. मी वालचंदला काय दिलं हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. पण वालचंदने मला काय काय दिलं असा थोडा स्वार्थी वाटणारा विचार आज करतो. त्यापैकी सगळ्यात मोठी भेट म्हणजे खूप चांगले काही  'शे' विद्यार्थी. २०१० ते २०२१ या कालावधीत बाहेर पडणाऱ्या बारा तुकड्यांना मी प्रत्यक्ष शिकवलं. हिशोब काढला तर ती संख्या ९०० च्या पुढे जाईल. मला खरं घडवलं ते या सगळ्यांनी. दहाहून अधिक वर्षांचा कालावधी या सगळ्यांमुळे खूप आनंदात गेला. अशा सगळ्या विद्यार्थ्यांबरोबरच्या खूप आठवणी आजही ताज्या आहेत. जश्या माझ्या मनात आहेत तशाच अनेकांच्या मनात असणार आहेत. मग त्या सगळ्या कागदावर उतरवायचा  अट्टाहास नको म्हणून प्रातिनिधिक आठवणी लिहिल्या.
गेले वीस दिवस हे सगळं वाचत असताना एक प्रश्न अनेकांना पडला असेल. काही जणांनी तो प्रत्यक्ष विचारला तर काहींना त्याचे उत्तर कळल्याचा भास झाला. टाटा मोटर्स सोडून वालचंद मध्ये का आलोया प्रश्नाचे उत्तर देणं अवघड आहे त्यापेक्षा वालचंद का सोडलंया प्रश्नाचे उत्तर देणे कितीतरी जास्ती अवघड आहे. दोन्ही प्रश्नांना शिकवायची हौस होती म्हणून वालचंद मध्ये आलोआणि वेगळे काहीतरी करून बघायचं होतं म्हणून वालचंद सोडलंअसं एका वाक्यात उत्तर देऊ शकतो. पण तसं करणं उचित नाही. त्यातून अनेक प्रश्न सुरु होतात. पहिला, ‘वेगळं काहीतरी करून बघायला वालचंद सोडायलाच हवं होतं का (म्हणजे सरकारी अनुदानित महाविद्यालयातली सातव्या वेतन आयोगाचा पगार देणारी कायमस्वरूपी नोकरी सोडायची काही गरज होती का)?’ आणि दुसरा, ‘वालचंद मधल्या राजकारणाला, त्रासाला, चांगल्या उपक्रमांना झालेल्या विरोधामुळे कॉलेज सोडलं का?’ या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणे त्या मानाने सोपे आहे. वालचंद मध्ये येताना कधी मिळणाऱ्या पगाराचा जास्ती विचार केला नव्हता. इथे शिकवत असताना आणि वर्गाबाहेर अनेक उपक्रम करत असतानाही त्यातून किती पैसे मिळतील असा विचार केला नव्हता. मग सोडताना तरी तो विचार कशाला? सरकार कृपेने पेन्शनची बेडी ही आमच्या पिढीच्या पायात नाही. तसेच राजकारण, विरोध, त्रास हे सगळे समाजव्यवस्थेचे एक भाग आहेत. वालचंद मध्ये कधीकधी त्याचा कहर झाला ही गोष्ट खरी आहे. पण या विरोध, राजकारण या गोष्टींना कंटाळून वगैरे मी वालचंद सोडलं नाही. त्या सगळ्यावर मात करायची किंवा ते सगळं बाजूला ठेवून आपण ठरवलेलं चांगलं काम करत राहण्याची शक्ती ही याच वालचंदमध्ये मला मिळाली हे ही नाकारता येणार नाही.
 २०१७ पासूनच वालचंद मधून बाहेर पडायचा विचार डोक्यात सुरू झाला. आपली कुठलीही नकारात्मक भावना या विचारामागे नाही ना? हे तपासण्यात पहिले काही महिने गेले. त्यानंतर मात्र कॉलेजमध्ये दहा वर्षे पूर्ण करून २०१९ मध्ये कॉलेजमधून बाहेर पडायचं असं पक्क  ठरवलं होतं. तोपर्यंत मी वालचंद मध्ये establish झालो होतो की नाही माहिती नाही पण वालचंद हा comfort zone झाला होता. comfort zone मधून बाहेर पडल्याशिवाय प्रगती करता येत नाही हे theoretically खरं असलं तरी comfort zone च्या बाहेर पडणं practically तितकंच अवघड असतं. आणि म्हणूनच त्यासाठी लागणारी शक्ती गोळा करणं पुढची दोन वर्ष चालू होतं. याच कालावधीत, मी योग्य दिशेने आणि सर्व दिशांनी विचार करतोय ना, स्वतःबरोबरच इतरांचा पण विचार करतोय ना, हे बघण्याचं काम ; कधी विरोध करून, कधी support करून, कधी प्रश्न विचारून, कधी बोलून तर कधी न बोलून प्राची करत होती, हे माझं सुदैव. वालचंद सोडताना सगळ्यात मोठी अडचण काय होती तर उत्तम विद्यार्थ्यांना सोडून जावं लागणार  ही. अनेकांना आश्चर्य वाटेल पण दरवर्षी नव्याने येणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर एक  घनिष्ठ नातं निर्माण झालेलं होतं. म्हणूनच शेवटच्या दोन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने त्यातून बाहेर पडू असं ठरवलेलं होतं. ते फारसं जमलं नाही म्हणा. म्हणूनच मग वालचंद मधलं वास्तव्य आणखी ६ महिने लांबवावंसं वाटलं.
मी राजीनामा देणार आहे हे जवळच्या सहकाऱ्यांना आधीचे काही महिने सांगत होतो. पण त्या कुणाला ते पटत नव्हतं किंवा ते पटवून घेत नव्हते. अगदी १३ नोव्हेंबर २०१९ ला मी आज राजीनामा देतोयअसं सांगितल्यावरही त्यांना ती चेष्टाच वाटली. सहकाऱ्यांना हे सांगणं त्यामानानी सोपं होतं पण विद्यार्थ्यांना सांगणं आणि पटवणं जास्त अवघड गेलं.
त्या सेमिस्टर मधल्या फायनल इयर वरच्या शेवटच्या तासाला हा माझाही वालचंद मधला शेवटून दुसरा तास आहे” (शेवटचा तास दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वर्गावर होता) असं जाहीर केल्यावर सुद्धा कोणी ते seriously घेतलं नाही. कारण ही बातमी संध्याकाळपर्यंत त्या तासाला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचली नव्हती. एरवी अशी काही बातमी काही सेकंदातच सगळीकडे पसरते. त्याच रात्री मग ही बातमी आश्चर्यकारकरीत्या अन्य विभागात काम करणाऱ्या एका शिक्षक सहकाऱ्यांनी काहीसा विचित्र मेसेज पाठवून (हे असलं सगळं  वालचंद मधे चालायचंच असं मी गृहीत धरलं होतं.) सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. माझं काम सोपं झालं. अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाविरुद्ध निषेधही नोंदवला.
शेवटचा महिना..डिसेंबर.. नेहमीप्रमाणे परीक्षा. त्यासाठी पेपर काढणे, पेपर तपासणे, प्रॅक्टिकल-ओरल परीक्षा यातच गेला. कॉलेज प्रशासनाने पण अपेक्षेप्रमाणे राजीनामा लगेच स्वीकारला आणि कधी नव्हे ते बाकी सगळ्या फॉर्मॅलिटी तत्परतेने केल्या. त्याबद्दल मी खरंच आभारी आहे.
शेवटचा दिवसही नेहमीप्रमाणे सुरू झाला. आदल्या दिवशीच परीक्षेसंबंधीची सगळी कामं पूर्ण केली होती. बरेच सहकारी आणि अनेक विद्यार्थी सुट्टीवर होते. काही विद्यार्थी भेटून गेले. काही सहकारी गप्पा मारून गेले. मला मात्र काय करावं कळत नव्हतं. एक निर्विकार स्थिती होती. कारण आनंद तर नक्कीच नव्हता ,ना कुणाबद्दल राग होता. दोन्ही बाजूंनी काही कटू न होता मी वालचंद मधली नोकरी सोडत होतो, माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थी म्हणून इथे येत राहीनच असा विश्वास होता, त्यामुळे मग दुःखही मर्यादित होतं.
विभागात झालेला अनौपचारिक निरोप समारंभ हे त्या दिवशीचे पहिले आश्चर्य. कारण प्रथेप्रमाणे फक्त सेवानिवृत्त होणाऱ्यांचाच निरोप समारंभ व्हायचा. राजीनामा देणाऱ्यांचा निरोप समारंभ झालेला आठवत नव्हता. पण तो छोटेखानी गप्पांचा कार्यक्रम खूप छान झाला. त्याचे फोटो श्री. भंडारी सर यांनी facebook वर टाकल्यामुळे मग बातमी जगजाहीर झाली.
पण दुसरा आश्चर्याचा धक्का बसला जेंव्हा एका विद्यार्थ्याचा मेसेज आला सर, आमची ओरल चालू आहे तेंव्हा सहा वाजेपर्यंत थांबा. आणि घरी यायला उशीर होईल असे कळवून ठेवा.संध्याकाळी फायनल ईयरचा जवळजवळ सगळा वर्ग एकत्र जमला होता. दरवर्षी फायनल इयरच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होत असतो. पण आता ते सगळे मला निरोप द्यायला जमले होते. दुर्मीळ प्रसंग ना! सुरुवातच झाली प्रश्नोत्तरांनी. फक्त आज ते सगळे प्रश्न विचारत होते आणि मला उत्तरं द्यायची होती. आधीची तीन वर्षं वर्गात आणि परीक्षेत अवघड अवघड प्रश्न विचारून  मी त्यांना त्रास दिला होता ना. त्याचा जणू बदला घेतला जात होता. नंतर अनेकांनी माझ्याबद्दल लिहिलेल्या आठवणींचे एक आणि वर्गातल्या प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा असलेले एक अशी दोन सुंदर भेट कार्ड मला दिली.


 
शेवटी सगळ्यांनी मिळून खाल्लेला केक
आणि काढलेले अनेकानेक फोटो.
राजीनामा देऊन नोकरी सोडणाऱ्या शिक्षकाला विद्यार्थ्यांनी दिलेला इतका हृद्य निरोप समारंभ क्वचितच घडत असेल नाही. मी नशीबवान आहे इतकंच म्हणेन! 
काँलेज, त्यातले विद्यार्थी, सिलँबस,शिक्षणपद्धती, इंजिनिअरिंग क्षेत्राबद्दलची माझी मतं असं खूप काही लिहिता येईल..पण , पण मी लेखाच्या सुरुवातीला म्हंटलं तसं मी लेखक नाही.. म्हणून केवळ स्वतः घेतलेल्या अनुभवांवर आधारित ही "वालचंद डायरी" आज संपवत आहे.  

15 comments:

  1. Personally thankfully to you for these diaries.
    Goodluck

    ReplyDelete
  2. ही लेखमाला कधीच संपू नये असे वाटत होते(समारोप निश्चित होणार हे माहीत असूनही). मागील 3 लेख भावनिक करून गेले. आम्ही स्वतः जगलेले दिवस तुमच्या डोळ्यातून पुन्हा पाहिले. काय comment करावी सुचलेच नाही. आमची बॅच खरंच चांगले नशीब घेऊन आली. पुढच्या walchandites पिढींना आमच्या सारखे नशीब नाही याची खंत वाटते.
    संपूर्ण लेखमालाच जणू काही प्रत्यक्षदर्शी असल्याप्रमाणे वाचकांना भासवणे हे एक वेगळंच शब्दसामर्थ्य! तुमचे नवीन वाटेवरील अनुभव कथन व्हावे ही इच्छा.

    ReplyDelete
  3. Your words always inspiring for us always from 1st lecture of graphics till fairewell heartouching moments hope sir this inspiration must go on so that after engineering also we conti. Learning with you sir.......!!!!

    ReplyDelete
  4. आमचा कधी तुमच्याशी संवाद नाही झाला पण तुम्ही मात्र आम्हा सगळ्यांना माहिती होता.तुम्ही कधी आम्हाला शिकवायला याल याचाच विचार किंबहुना ही इच्छा आम्ही मनात ठेवली होती पण ते काही झालं नाही.कारण अचानक आलेला तुमचा हा निर्णय आमच्यासाठी पण धक्का दायक होता.पण सर आम्ही नेहमी तुमच्या कडून शिकण्यासाठी उत्सुक होतो ते मात्र खरं आहे.

    ReplyDelete
  5. Sir, amhala labhlele tumhi best teacher hotat ani ithun Pudhe dekhil je students tumchya guidance khali kam kartil te nashibvan ch astil. We will always get inspired by you and will show the sincerity that you induced in us!

    ReplyDelete
  6. Walchand diary...amazing...
    आता उद्या काय वाचणार.?? परंतू तुमचे dhyanprabodhini चे अनुभव वाचायला नक्कीच आवडतील..👍👍 शुभेच्छा

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. श्री. परांजपे सर यांस ,

    स. न. वि. वि.

    सर या पत्रा निमित्ताने विशेष नमूद करावे वाटते की आत्तापर्यंत आपण जे Gears चे ज्ञान आम्हास दिले ते अमूल्य आहे. जेव्हा तुम्ही वर्गात Gear शिकवायला सुरवात केली त्यावेळी Gear आणि Gear Pairs बद्दल कुणालाच विशेष अनुभव नव्हता. कोणताही Gear कुठेही mesh होऊ शकत नाही हे त्यावेळी बहुदा कुणालाच माहित नव्हते. सारख्या दिसणाऱ्या Gears चे module वेगळे असू शकतात आणि त्यामुळे सारखे असूनही ते mesh होऊ शकत नाहीत हे समजयाला तसा आमच्या क्लास ला वेळ लागला. तसेच same module असेल तर कितीही वेगळ्या आकारचे Gear सहज mesh होऊ शकतात याची शिकवण पण आपल्याकाढूनच मिळाली.

    हळूहळू portion पुढे जाईल तसे क्लास मधले वातावरण अधीकच उत्साही होत गेले. काळाच्या गरजेनुसार प्रत्येकजण आपापल्या प्रकारे Module , No. of teeth ,PCD etc variables vary करून योग्य ते Gear Pair कॉम्बिनेशन मिळवण्याचा प्रयत्नात होता. तर काहीजण अंधारात बाण मारून कॉम्बिनेशन शोधण्याचया प्रयत्नात होते. काहींना ते कॉम्बिनेशन सापडले, काही जणांनी त्याचा नाद सोडून दिला, तर काहीजण अजूनही ते कॉबिनेशन शोधण्याचा प्रयत्नात आहेत.

    मुद्दा हा आहे कि हे सर्व करत असताना आपले दिशादर्शन आणि आपला सहभाग सर्वांच्याच उपयोगी पडला. काहीजणांनी हेलिकॅल गियर, बेवेल गेअर्स चा सुद्धा पर्याय निवडाल. हळुहळू वर्गामध्ये कंपाउंड गियर ट्रेन्स चा पण ट्रेंड आला. सुरवातीच्या काळातील अवगड वाटणाऱ्या Compound gear trains, Planetary Gear train अनुभववायला लागल्यापासून सोप्या वाटू लागल्या. काही क्लिष्ट Planetary gear trains तुम्ही केलेल्या मार्गदर्शनमुळेच सहज जमल्या .

    म्हणायचे असे की वर्गामध्ये जेवढ्या काही ट्रेन्स आहेत त्यामध्ये एक तरी गियर असा आहे कि ज्याचे Module तुमच्या गियर सोबत Match होते. काही Cyclic Gear Trains मध्ये तरी तुमचा रोल Ring Gear सारखा आहे. सगळ्यन्सोअबत mesh मध्ये पण असता आणि Planet Gears ना कळू पण देत नाही कि कोण कुणामुळे फिरत आहे. पण त्यामुळेच Power अखंड Transmit होत राहते हे निश्चित .

    त्यामुळेच ना क्लास मधले सगळे Gears म्हणतात,

    "It Was Nice Meshing With You Sir!"


    कळावे.



    आपलाच,
    एक Spur Gear.

    ReplyDelete
  9. चिरंजीव अमर,
    गेली दहा वर्षे तुझा गुरु,एक सहकारी,मित्र (तुझ्या भाषेत सखा),आणि काही हीतचिंत्कानी तसेच विरोधकांनी उल्लेख केल्या प्रमाणे मानस पिता (यांच्या मते तू माझा मानस पुत्र आहेस)अश्या विविध नात्यांच्या भूमिकेत मी तुझ्या सोबत वावरलो पण तुझ्यातल्या लेखकाच्या क्षमतेचा प्रत्यय मला नव्हता. तो या लेख मलिकेमधून आला.याबद्दल तुझे अभिनंदन आणि कौतूक ही! अभिनंदन यासाठी की walchand मधिल अनुभव तू अचूक आणि परखडपणे मांडलेस. अगदी एखाद्या मुरब्बी लेखकांच्या सारखे! कौतूक यासाठी की या सगळ्या लिखाणास लागणारे सर्व साहित्य (फोटो,पत्रं,टाईम टेबल च्या प्रती इ. )जपून ठेवून त्यांचा परिणाम कारक वापर केलास.
    विद्यार्थी दशेपासून ते सेवा निवृत होइपर्यंत एकूण 42 वर्षांचा माझा WALCHANDशी संबंध तथापि दहा वर्षात जी विद्यार्थी प्रियता आणि शिक्षक म्हणून जी प्रतिभा संपन्नता तू मिळविलीस त्या पातळीवर मी जावू शकलो नाही. पण शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ झालेलाचा आनंद ,एक समाधान व अभिमान या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या.
    काही व्यक्ती अथांग आणि विलक्षण असतात त्यात तूझी गणना होते. प्रगल्भ बुद्धी,प्रतिभासंपन्नता ,जबरदस्त इच्छाशक्ती हे सगळं मी जवळून अनुभवले किंबहुना यातून मला काही शिकता आलं.
    Walchand मधील काही अनुभव कटू होते. पण तेही आपण enjoy केले.विशेष करून विप्क्षित व कट कारस्थानि लोकांच वागण.कदाचित तूला कल्पना नसेल पण या pawky मंडळींनी मला पेन्शन मिळू नये यासाठी सुध्दा प्रयत्न केले. अर्थात ह्या गोष्टी चा तुझ्या लेख मालिकेच्या अभिप्राय शी ditect संबंध नाही पण हे इथं नमूद एवढयासाठी करतो की आपल्या विद्यार्थ्यांना हे कळावे की अशा वातावरणामधे राहून ही या गोष्टींचा त्यांना शिकवितांना काही परिणाम होवू नये याची दक्षता आपण घेतली.
    Consutancy च्या बाबतीत ही तू माझ्यापेक्षा कक्ंन भर वरचढ राहिलास. एका दिवशी 7 ते 8 machines चे जागेवर balancing करने म्हणजे ग्रेट! तुझ्यातल्या enrgy चा तो एक वेगळा अनुभव. Hats off !!
    कॉलेज पातळी वरचा आदर्श शिक्षक पुरस्कार खर तर तूला मिळायला हवा होता. पण तिथहि गटबाजी!बहूदा 2014 साल असावे .तुला आणि मला 44 व 43 (अनुकमे) असे मुलांनी आदर्श शिक्षकासाठी त्यांचे चॉइस दिले होते. अंतिम निवडीच्य वेळी 25% marks मैनेजमेंटने द्यायचे होते.पण तिथही राजकारण !
    असो ,ठरवून दिलेल्या पुरस्कारपेक्षा निरपेक्ष मनाने विद्यार्थ्यांनी तूला आदर्श मानलं यातच सगळं काही आलं!
    विभागातील pawky मंडळींच्या कारस्थानाचा जो त्रास मला झाला त्याची ज्हळ काही प्रमाणात तुलाही बसली. त्यावेळी तू,अप्पा (APPatil),आबा (AB Admuthe)व सुहास यांनी जो आधार व धीर दिलात याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
    अमर, तूझा Walchand सोडण्याचा निर्णय मात्र मला अजिबात पटला नाही आणि आवडला ही नाही. चि.शैलेंद्र ने प्राध्यापक पदाचा राजिनामा दिल्या नंतर जे दुःख झाले त्यापेक्षा कितीतरी पटीने तूझ्या या निर्णयाने झाले. विभागाचे स्टँडर्ड (विशेष करुन BAJA, Efficar व तशा activitis)ज्या पातळी वर नेऊन ठेवले आहेस त्याच्या परम्परेचे काय?.तूझ्या उत्तम शिकवण्यास येणारी पिढी मुकणार आहे त्याच काय? अप्पा. आबा,सुहास. नाईक
    ,APMane ही मंडळी ही तुझी उणीव भरुन काढतील .
    Walchand सोडण्या पासून तूला रोखू शकलो नाही याची खंत मनात कायम राहिल.
    चि.प्राचीच कौतूक करायलाच पाहिजे. काहिसं तिच्या मनाविरुध घेतला गेलेला निर्णय असून सुध्दा ती तुझ्या पाठीशी ठामपणे ऊभी आहे.

    दोन वर्षापूर्वी,तू एक गाणे मला whats app वर पाठविले होतेस. त्यात गुरुच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त होतेय. तूझ्या प्रती तुझ्या विद्यार्थ्यांच्या ही त्याच भावना आहेत.कृपया ते गाणे तुझ्या ब्लॉग वरून पाठव

    S. P.Chavan





    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. सर मी सगळे Blogs वाचले, कमेंट काय लिहावी असं काही उमजत नव्हत. माझ्यासारख्या काही विद्यार्थ्यांकडून प्रामाणिकपणाचेे हे दोन-चार शब्द....
    माझा आणि तुमचा दूर दूर चा संबंध आलाय असा म्हणायला काही हरकत नसावी. कारण एकूण माेजून दाेनच Semester आपला संबंध आलाय. तुमच्या मुळे खूप काही शिकायला मिळाले. एक गाेष्ट जाणीवपूर्वक सांगायला आनंद वाटताे की एखादा Design करताना करावी लागनारी Thought Process विशिष्ट निर्माण झालेली आहे. तुम्ही सांगितलेला प्रत्येक शब्द न शब्द आम्हाला जगण्याच बळं देत हाेता, पण त्याची किंमत आम्हाला त्यावेळी समजली नाही, त्याची जाणीव आता जीवन जगताना समजतेय.... तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा....

    ReplyDelete
  12. Very nicely expressed. Grade card is real award of your efforts, kindness, friendly relationship with students.👌👌👌

    ReplyDelete
  13. फार म्हणजे फारच भारी... मोठा निर्णय .... सहजता... मोठेपणा.... खूप काही आहे तुझ्याकडे.... best.... proud of you....

    ReplyDelete

भाग २१ - वालचंद सोडताना

गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्ह...