वालचंद मध्ये दाखल झालो त्या पहिल्याच
दिवशी हे कळलं होतं की आपले दहावी आणि बारावी मध्ये मराठी व हिंदी विषय नसल्यामुळे
त्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत. पण ह्या परीक्षा दोन वर्षांमध्ये कधीही
दिलेल्या चालतात असे कळल्यामुळे मी थोडा निवांत होतो. कॉलेजमधले दैनंदिन रुटीन
चालू झाले. पहिल्या सत्रात मुलांबरोबरची इंडस्ट्रियल व्हिजिट, इन्फोसिस म्हैसूरचा प्रशिक्षण कार्यक्रम, नवीन सत्रात शिकवायला लागलेले नवीनच विषय यांमुळे
मराठी-हिंदी परीक्षा हा विषय थोडा मागे पडला. त्याला दुसरं कारण म्हणजे अशी
परीक्षा माझ्यापूर्वी दिलेले कोणी सापडलेच नाहीत. मराठी-हिंदीबरोबरच MSCIT ची परीक्षा पण द्यायची होती पण ही परीक्षा मात्र
कॉलेजमध्ये अनेकांनी दिलेली होती. BE / BTech किंवा ME / MTech Computer Science झालेल्यांना या परीक्षेतून सवलत असते (हे वाचून
थोडं बरं वाटलं !) त्यामुळे आमच्या नवीन जॉईन झालेल्यामधले काही जण सुटले.
माझ्याबरोबर विभागात रुजू झालेले मी आणि डॉ. केदार इनामदार असे दोघे मिळून मग ह्या
परीक्षेमागे लागलो. प्रत्यक्ष वर्ग अटेंड न करता पण ही परीक्षा देता येते.
त्यामुळे जरा जीवात जीव आला. राम मंदिर जवळच्या एका सेंटर वरून अर्ज भरला आणि
ठरलेल्या दिवशी परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देऊन टाकली. परीक्षा सरकारी
नियमामुळे दिलेली असल्यामुळे परीक्षा फी कॉलेज कडून परत मिळते असे कळले. अर्थातच
ही प्रक्रिया प्रत्यक्ष परीक्षा देण्यापेक्षा अवघड असते हे कळायला मात्र बराच वेळ
गेला. परीक्षा फी रुपये 800 भरलेली
असताना आणि त्याची वैध पावती असतानासुद्धा बऱ्याच प्रयत्नांनंतर रुपये तीनशे परत
मिळाले. ३०० चं का तर GR मध्ये
३०० च लिहिलेले आहेत. “पुरातन
काळी हा GR निघाला तेव्हा परीक्षा फी तीनशे होती
आता फी वाढली तर तसा बदल करायला नको का?” असं
तावातावाने विचारल्यावर “आम्हाला
तो अधिकार नाही” असे उत्तर देणाऱ्या क्लार्कमुळे मला
पुलंच्या “म्हैस” मधल्या ऑर्डरली साहेबांची आठवण झाली आणि त्यातल्या
प्रवाशाप्रमाणे हताश होऊन मी सुद्धा परत फिरलो.
मराठी - हिंदी पैकी हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळे ती अवगत पाहिजे हे मला पटण्यासारखं होतं. मराठी सुद्धा सरकारी कार्यालयात महाराष्ट्रात काम करणाऱ्याला येणे गरजेचे आहे. पण इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवणाऱ्याला कशाला ? इथे तर ठायीठायी इंग्लिश मधून शिकवा म्हणून ओरडत असतात. परंतु “कॉलेजमध्ये प्रशासकीय भाषा म्हणून मराठीचा वापर होत असल्याने प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे” असं एक ठणठणीत उत्तर मिळालं. पण परीक्षा कोण घेतं, कधी असते, अभ्यासक्रम काय? नाही, कुणालाच माहिती नाही. यावेळी ऑफिसची जबाबदारी असलेले नारायण मराठे सर यांचे विचार वेगळेच होते. “छे छे! मराठी-हिंदीचा GR ऑटोनॉमस कॉलेज ला ऍप्लिकेबलच नाही. तू काही त्या परीक्षा द्यायची गरज नाही. " बाकी पुढे काही अनुभवातून मराठे सरांचे विचार नियम पाळण्यापेक्षा नियम तोडण्याकडे किंवा पळवाट काढण्याकडे जास्ती आहेत हे लक्षात आलं आणि परत एकदा माझी शोध मोहीम चालू झाली. हे सगळं होईतो कॉलेजमध्ये दाखल होऊन एक वर्ष पूर्ण झालेले होतं.
गुगल गुरु हे आज इतके तेव्हा पॉप्युलर झालेले नव्हते. पण तरी काही माहिती मिळाली. महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालय या परीक्षा घेते. मराठीच्या नववी आणि दहावी अशा दोन्ही परीक्षा द्याव्या लागतात. अरे देवा! पण अभ्यासक्रम lower मराठीचा. म्हणजे इंग्रजी माध्यमाची मुले मराठीची जी पुस्तके वापरतात ती. हुश्श! त्यातही काही निवडक धडे व कविता. बाकी पत्रलेखन व्याकरण वगैरे वगैरे आणि त्याच दरम्यान तोंडी परीक्षा सुद्धा. पण परीक्षेसाठी चा फॉर्म कुठे भरायचा वगैरे मात्र माहिती मिळाली नाही. कॉलेजमधल्या सिव्हिल डिपार्टमेंट च्या डॉक्टरेट असलेल्या मुनवल्ली सरांनी अशी परीक्षा पूर्वी दिलेली आहे असे कळले, पण त्यांनाही नेमकं काही आठवत नव्हतं. “ कसाबसा पास झालो बग ती परीक्षा” असं त्यांनी त्यांच्या टिपिकल कानडी शैलीत सांगून टाकलं. पण त्यांच्या सारख्या सिनियर प्रोफेसर नी सुदधा ही परीक्षा कधीतरी दिलीय हे ऐकून बरं वाटलं ,आपणही द्यायलाच हवी .पण परीक्षा देणे एकवेळ सोपे पण आधीची शोधमोहीम प्रक्रिया त्रासदायक होती. म्हणून या परीक्षेतून सुटण्याचा काही उपाय आहे का याचा शोध सुरू होता. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेरीस तो १९८७ सालचा GR (शासन निर्णय – Government Resolution ) सापडला. असा कुठलाही GR शोधायचा असेल तर आमचे मित्रवर्य अनंत कोकणे सर यांना शरण जायचे असते असा कायमस्वरूपी धडाही मिळाला. अडीच अडीच तासाचे प्रत्येकी शंभर मार्कांचे दोन पेपर आणि पन्नास मार्काची तोंडी परीक्षा. पहिल्या पेपरमध्ये पाठ्यपुस्तक आणि व्याकरण तर दुसऱ्या पेपरमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक लेखन ...आणि तोंडी परीक्षेमध्ये भाषण, संभाषण इत्यादी इत्यादी. बापरे! परीक्षेतून सवलत मिळवण्याचे काही उपाय सुद्धा त्याच GRमध्ये होते पण वरिष्ठ प्राध्यापक श्री. जे. जी. कुलकर्णी सरांनी “परीक्षा देऊन टाक की रे तुला काय मराठी जड नाहीये. बाकीचे उपाय जास्ती त्रासदायक आहेत.” असा सल्ला दिल्यामुळे आता परीक्षा द्यायची असा निर्णय घेऊन टाकला. खरंतर मुनुवल्ली सरांना पण ही परीक्षा द्यावी लागलीय हे समजले तेंव्हाच ही परीक्षा देऊन टाकू असं मन म्हणत होतं ,पण तरी जरा काही पर्याय आहे का म्हणून बघितले इतकंच..
परीक्षा म्हटलं की माझ्यासारख्या परीक्षार्थ्याला काही वेगळाच जोश चढतो. त्याच उत्साहात एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे फॉर्म भरण्याची प्रक्रिया असा दुहेरी लढा चालू झाला. भाषा संचालनालयाच्या साइटवरून.. क्षमस्व संकेतस्थळावरून.. जुन्या प्रश्नपत्रिका ,राजभाषा व्यवहार कोश वगैरे पुस्तके मिळवली. ताम्हणकर यांच्या दुकानात जाऊन जेव्हा इंग्रजी माध्यमाचे नववीचे मराठीचे पुस्तक मागितलं तेव्हा अशोक काकांचा चेहरा बघण्यासारखा झाला. हे काय प्रकरण आहे ?त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी कपाळावर हात मारला. पण मग “वत्सा तुज प्रत कल्याण असो” अशा अविर्भावात पुस्तकांबरोबरच नवनीतचं गाईड पण मला भेट दिलं. ८ ऑगस्ट २०११ चा परीक्षेचा दिवस उजाडला. परीक्षा पुण्यात शिवाजीनगरच्या भारत इंग्लिश स्कूलमध्ये. मी आदल्या दिवशीच पुण्यात दाखल झालेला , ते ही प्रवास भत्ता कॉलेज कडून मिळवून!! गंमत म्हणजे अशा परीक्षेसाठी पुण्याला चाललो आहे हे सांगायला जेव्हा संचालक डॉ.वाय. व्ही. जोशी सर यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी पण हे सगळं कशासाठी असा प्रश्न केला. मग म्हटलं, “सर तुम्ही एक पत्र द्या. कॉलेजमध्ये प्रशासकीय भाषा म्हणून मराठीचा वापर हा या व्यक्तीला गरजेचा नाही." असे पत्र मिळाले कि ती परीक्षा द्यायची गरज नाही. मग त्यांनी पण “जाऊदे परीक्षा देऊन टाक.” असा सल्ला दिला. अडचणीच्या वेळी अभ्यासच उपयोगी पडतो हेच खरे.
परीक्षा अगदीच सोप्पी होती. पण आजूबाजूला अनेक अमराठी IAS, IPS अधिकारी सुद्धा मेटाकुटीला आलेले होते. समोरच्या बाकावरचे एक सरदारजी “अरे भाई ये मराठी मे पानी कुछ अलग तरीकेसे लिखते है ना?” असे विचारत होते. पण 'ण' चा बाण त्यांच्यापर्यंत पोहोचवायला माझ्याकडे अर्जुनाचे धनुष्य कुठे होते. स्वतःचा मराठी बाणा आणि तत्व यांना थोडी मुरड घालून आजूबाजूच्या तीन-चार लोकांना मदत केली मी... परीक्षा मजेत पूर्ण झाली. आता याला एकप्रकारे काँपी म्हणायचे का काय ते माहिती नाही.... उभ्या विद्यार्थीदशेत तरी कधी मी काँपी केली नव्हती. पण अमराठी भाषिक IAS किंवा तत्सम पोस्टवर असलेले अधिकारी या असल्या परीक्षेपायी नापास व्हावेत हे काही पटेना..तोंडी परीक्षेमध्ये पण 'कार्यप्रवणता' , 'धारिणी' वगैरे जड जड शब्द वापरून मुलाखतकाराला नामोहरम करायला मी विसरलो नाही( मग मी पण ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे इथं शिकलोय म्हंटलं) काही दिवसातच निकाल लागला. एकूण ५८ उमेदवारांमध्ये मी 250 पैकी 202 मिळवून पहिला आलो होतो.
खरी मजा होती हिंदी परीक्षेची. कारण त्याला उच्च हिंदी म्हणजे हिंदी माध्यमाचं हिंदीचं दहावीचं पुस्तक होतं आणि माझं हिंदी महाभारता मधलं म्हणजे ‘महादेव की सौगंध’ पासून पाठ्यपुस्तकातल्या ‘कबीर के दोहे’ याच्या पुढे जात नव्हतं. पण ह्या वेळी आणखीन सात जण परीक्षा द्यायला बरोबर होते. सांगलीमध्ये हिंदी माध्यमाची शाळाच नसल्यामुळे पुस्तक पण पुण्याहून आणावे लागले. परीक्षा परत एकदा पुण्यातच २८ ऑगस्ट २०११ ला. परीक्षेला आम्ही आठ जण एकाच वर्गात. मग काय, गप्पा मारत, एकमेकांना विचारत पेपर लिहिणे सुरु. हे तत्वतः चूक आहे हे तेंव्हाही कळत होतं आणि आताही मी ते अमान्य करत नाही.. पण मी काय किंवा इतर सहकारी MTech, Doctarate असताना.. या परीक्षेत नापास झाले असते तर या सारखं दुर्दैव नव्हतं..एका टप्प्याला तर पर्यवेक्षिका म्हणाल्या पण “अहो, तुम्ही सगळे शिक्षक आहात ना? मग जरा शांत बसून परीक्षा द्या की.” त्यावर “मॅडम कॉलेजमध्ये अशी मजा करायला मिळत नाही” असं आमच्यातलं कोणीतरी म्हणालं. अशाप्रकारे दोन्ही पेपर, तोंडी परीक्षा आणि निकाल सगळं सुखरूप पार पडलं. आणि आमचं घोडं ‘हिंदीच्या गंगेत न्हालं’ (आता हे हिंदीत कसं म्हणायचं ते मात्र विचारू नका)
अजून मराठीची उच्चस्तर परीक्षा बाकी होती. पण आता पुरेसा अनुभव गाठीशी होता. परीक्षा द्यायला बरोबर सिव्हिल विभागामधले डॉ. गुमास्ते सर होते. नोव्हेंबरमध्ये अपेक्षित परीक्षा झाली नाही आणि मग डिसेंबरमध्ये मी Phd चे कोर्सवर्क करायला IIT मुंबईला गेलो. पण लवकरात लवकर ही परीक्षा देऊन टाकू असं ठरवलेलं होतं. अखेर फेब्रुवारी मध्ये पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये ही दुसरी परीक्षा पण देऊन टाकली. त्यादिवशी तारीख होती पाच फेब्रुवारी २०१२. वालचंद मध्ये दाखल होऊन बरोबर तीन वर्षे झालेली.
पहिल्या
दिवशी बसलेला धक्का आणि हा सगळा खटाटोप केल्यावरही मी वालचंद मध्ये एस्टॅब्लिश
झालो असं म्हणणं धाडसाचं ठरलं असतं त्यासाठी आणखीन काही काळ गेला आणि काही विचित्र
आणि दुःखद घटनांमधून मला पार पडावं लागलं त्याची कथा परत कधीतरी. पण मी तोपर्यंत classroom teaching and mentoring मधे मात्र मी मुरायला लागलो
होतो..त्या अर्थी Establish
झालो होतो. कारण सरकारी काँलेज, त्या आँफिशियल अडचणी या सगळ्याचा त्रास, कटकट मी मुलांमधे असलो किंवा शिकवायला लागलो कि
पूर्ण विसरून जायचो.....teaching was my tonic to battle with other things.
अमर परांजपे.
🙏
ReplyDeleteTeaching was tonic for you...and you lectures were अमृत for us😄
ReplyDeleteCouldn't agree more!
Delete✌🙌
Delete👌🙏
ReplyDelete👍🙂
ReplyDeleteLoved it.
ReplyDeleteविचित्र आणि दुःखद घटना कोणत्या सर....
ReplyDeleteखूपच छान लिहिलं आहेस अमर
ReplyDelete👌
ReplyDelete👌👌
ReplyDeleteWah.. Ek ekdum chan..
ReplyDeleteFarach chan
ReplyDeleteहे वाचून खरेच कधी कधी सरकारी (शासकीय पेक्षा चपखल शब्द) निर्णय एखाद्या व्यक्तीला किती त्रासदायक ठरू शकतात, याचा अनुभव आला.म्हणजे व्यवहार्य भाषा येत असतानाही परीक्षेचा आग्रह ठेवणे म्हणजे फारच झाले असे वाटते.
ReplyDeleteयावरून आठ्वले, तुला हिंदीची परीक्षा देण्यासाठी हवं असलेले पुस्तक शोधायला मी पुण्यात आप्पा बळवंत चौकात गेले होते. खूप शोधूनही तिथे कोणत्याच दुकानात ते मिळाले नाही.शेवटी विचारत विचारत कसबा पेठेत ,एका किराणा cum पुस्तक दुकानात ते हिंदीचे पुस्तक मिळाले,☺.
असो.ब्लॉग वाचून छान वाटले. मुख्य म्हणजे अधून मधून तू इथे भेटत राहशील याचा आनंद वाटला.let the diary must continue
'ण 'बाणाचा👍👍
ReplyDeleteआणि प्रबोधिनी बद्दल आत्मियता आहेच...
एकदम छान..👍👍
Far bhari sir!!! Ata amhi roj vat baghat asato navin part yenyachi🙌🏻✌🏻
ReplyDeleteSirji khup chaan
ReplyDelete..teaching was my tonic to battle with other things
ReplyDeleteReal truth
👍
मार्मिक आहे आजच
ReplyDelete
ReplyDeleteसुंदर सर. . अतिशय सुंदर मराठी आहे तुमची याचि ग्वाही हा लेख देतोय. एरवी अनेकांची परीक्षा घेणारे तुम्ही; पण तरी मराठी भाषेच्या परीक्षेचं टेन्शन तुम्हाला देखील आलेलं यात काहीच गैर नाही कारण मुळात परीक्षा ह्या असतातच अश्या,त्यांच्या फक्त नावानेच आपण हडबडून जागे होतो आणि नवीन उत्साहाने व जोमाने परतएकदा स्वतःला सिद्ध करायला सुरु करतो. अश्याच त्या परीक्षा असायच्या machine Design आणि automobile engg च्या असायच्या.. कधी declared test तर कधी surprise test . . आणि सर्वात जास्त Challenging ज्या असायच्या त्या ओपन बुक टेस्ट.. Declared टेस्टला कितीही प्रयत्न केला तरी परीक्षेचा कालावधी संपण्यापूर्वी ५मिनिट उत्तरपत्रिका तुमच्या हातात द्यायची वर्गात एकाची पण तयारी नसायची. कधी कधी वाटायचं अगदी व्ही बी भंडारी देखील तुमचा पेपर द्यायला आले तरी त्यांचे देखी हेच हाल होतील. तुमच्या याच प्रश्न पत्रिकांनी आम्हाला पुस्तकाबाहेर काढलं.. पुस्तकीज्ञानापलीकडे जाऊन विचार करायला भाग पाडलं.. तिथूनच आम्हाला मिळाली पहिली google गुरुची साथ. कधी पेपर चांगला गेला तर रात्र रात्र झोप येत नसे त्याप्रश्नाचे उत्तर नेमके काय याच्या साठी दिवसभरातून ३-४ चकरा केबिन बाहेरून झालेल्या असायच्या .. आणि मग ती वेळ यायची उत्तर जाणून घ्यायची. . पटकन असं वाटायचं अरे असा विचार आपण का नाही केला किंवा अरे आपण बरोबर होतो फक्त धाडस करून उत्तर लिहायला पाहिजे होत.. परत एकदा प्रॉब्लेम बेस्ड थिंकिंग काय हे तुमच्याकडून शिकायला मिळालं... त्याचा उपयोग आजही मला माझ्या कन्सल्टन्सी field मध्ये होतोय.. खूप खूप
मनापासून आभार. .
Awesome and touching article... Keep sharing...
ReplyDeleteखूप छान लिहिलं आहेस अमर. शब्दरचना आणि मांडणी सुरेख.
ReplyDeleteNice Sir
ReplyDeleteपरीक्षा म्हणल्यावर जे जे वाटतं .... ते सर्व सही सही उतरलंय या लेख मध्ये आणि ते बाकीच्यांना परिक्षेत केलेली किंचित पण मनाविरुद्ध/ मनापासून मदत ... सर्व खूप नीट शब्दबद्ध केलं आहेस अमर .
ReplyDeleteअतिशय positive
ReplyDelete