Wednesday, May 6, 2020

भाग ३ - वर्गात शिकवताना (१)

माझ्या सुदैवानी शाळेपासूनच खूप चांगले शिक्षक मला लाभले. पुढे कनिष्ठ महाविद्यालात आणि वालचंदमधे सुद्धा दिग्गज अध्यापकांचे शिकवणे अनुभवले. त्यासाठी सायकल हाणत घामाघूम होऊन सकाळी आठच्या आधी कॉलेजमधे पण पोहोचायचो कारण त्या चांगलं शिकवणाऱ्या शिक्षकाकडून खरंच शिकण्यासारखं असे..चांगला शिक्षक म्हणजे काय ते त्यांच्या तासाला अनुभवले.. पण काही काही शिक्षकांच्या तासांना कधी झोप लागली आणि कधी तास संपला हे कळायचेही नाही... तर काहींच्या तासांना उपस्थितीच्या सक्तीपोटी बसायला लागल्यामुळे कुठे फुली गोळा खेळ, journal पूर्ण कर असले उद्योग चालायचे.

अशा सगळ्या स्वतः च्या विद्यार्थीदशेत घेतलेल्या अनुभवांमुळे आपण शिक्षक झाल्यावर कसं असलं पाहिजे आणि कसं नसलं पाहिजे ह्याची एक प्रतिमा डोक्यात तयार होती. या आदर्श प्रतिमेच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा असं ठरवूनच वालचंदमधे दाखल झालो. पण तोपर्यंत Semester चालू होऊन एक महिना उलटून गेला होता त्यामुळे वर्गात जाऊन शिकवायला (theory subject) कुठलाच विषय मिळाला नाही. पण माझ्या आधी १-२ आठवडे join झालेल्या एका सहकार्याला २ theory subjects मिळालेले होते. बसण्याची जागा शोधण्यापासून internet चा access मिळवण्यापर्यंत आणि library card पासून medical certificate मिळवण्यापर्यंत सगळी धावपळ एकत्रच सुरु होती. त्यामुळे त्यांना मदत म्हणा किंवा माझी हौस म्हणा त्यांचे काही तास मी घ्यायला लागलो. पण हे आपलं लुटूपुटूचं झालं.

खरा युद्धाचा प्रसंग आला तो पुढची semester चालू झाल्यावर जुलै २००९ मधे. MTech Design आणि मग टाटा मोटर्समधला अनुभव यावरुन SOM, TOM, Machine Design, Automobile Engg असा कोणतातरी विषय किंवा सगळ्यात junior असल्याने Engg Graphics किंवा BME असा कोणता तरी विषय माझ्या वाट्याला येईल अशी अपेक्षा होती. पण ..... पण...... मिळालं काय तर TY चं Metrology Quality Control आणि final year चं Operations Research. ....हे असं कसं झालं? विषय allotment कशी झाली किंवा व्हायची हा एक स्वतंत्र आणि गहन विषय आहे. त्यावर स्वतंत्रपणे लिहीणेच इष्ट!

OR ( Operations Research)तसा एकेकाळचा आवडीचा विषय आणि mathematical असल्याने शिकवायला जमेल असं वाटत असणारा. पण MQC ... रामा शिवा गोविंदा .... माझ्या विद्यार्थीदशेत Engg च्या ८ सेमिस्टरमधे सगळ्यात कमी मार्क कुठल्या विषयात होते तर ह्याच MQC मधे. म्हणजे कल्याणंच की... माझंही आणि विद्यार्थ्यांचंही... 'पदरी पडले पवित्र झाले' या भावनेने अभ्यासाला सुरुवात केली. स्वयंअध्ययनाची तंत्रे ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत शिकल्याने अवगत होतीच त्यामुळे विशेष त्रास झाला नाही. मधल्या काळात वालचंद कॉलेजच्या कृपेने म्हैसूरला ३ दिवसांचा pedagogy (शिकवण्याचे शास्त्र ) एक course केलेला होता. आणि MTech करत असताना पण TTTRI भोपाल ह्यांचे ५-५ दिवसांचे असेच course केले होते. त्यामुळे स्वतःच्या notes, रोज काय शिकवायचे, कुठले उदाहरण द्यायचे असं सगळं नियोजन, जय्यत तयारी करुन पहिल्या तासाला निघालो.

पहिले काही तास सुखरुप पार पडले. १-२ तासांमधे लक्षात आलं कि आपण तयारी करुन जातोय ते ४०-४५ मि. मधे संपतंय. मग आणखीन तयारी करुन जायला लागलो. पण जाणवायला लागलं कि ह्यात मजा येत नाहीये . If I am not enjoying, how can I believe that people sitting in front are? पण काय चुकतय कळेना. ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचे माजी प्राचार्य (कै) मा. विवेक पोंक्षे सर शिक्षकांसाठीच्या एका व्याख्यानात म्हणाले होते, "teach John not just maths", मग "हो बरोबर आहे ,मी करतोय ना विचार विद्यार्थ्यांचा. मग तरी काय होतंय? काय चुकतंय?" असा स्वसंवाद चालू असताना अचानक वीज चमकावी तसा विचार मनात आला. "Do I know my John?, मी ओळखतो का समोर बसलेल्यांना?" आणि आपसूकच उत्तर आलं "नाही". इतके दिवस मी स्वतः विद्यार्थी असताना कसा होतो तसेच सगळे असतील असं मी गृहीत धरलेलं होतं. आणि इथे तर माझ्यापेक्षा ७-८ वर्षांनी लहान (म्हणजे नवीन पिढीतलेच कि) ७०-७५ युवक युवती. प्रत्येकाला एक स्वतंत्र चेहेरा असलेले. आणि मी तर ह्यातल्या कोणाला ओळखतही नव्हतो...

त्यातल्या त्यात TY च्या मुलांशी थोडा परिचय होता. Banglore-Mysore Industrial visit च्या निमित्ताने झालेला. पण BTech चा वर्ग तर पूर्ण अपरिचित. Yes, I can't teach John unless & until I know John. आणि मग मी जरा माझ्या गाडीचा गिअर बदलला. Top gear मधे सुसाट निघालेली गाडी जरा second मधे टाकली. कारण मला दिशा थोडी बदलायची होती.
Practical ला एका वेळी एकच batch म्हणजे १५ च विद्यार्थी समोर असायचे. कुठलंच practical पूर्ण २ तास चालत नाही. या उरलेल्या वेळेचा उपयोग मग John ला ओळखायला करून घ्यायला लागलो. कधी गप्पा, कधी feedback किंवा कधी मुलं प्रयोग करत असतानाची निरीक्षणं. आणि मग हेच चेहरे वर्गात दिसायला लागले. हा किरण, हा सिद्धेश, ही अपूर्वा, ही प्रियांका ,हा गणेश, हा श्रीराम, ही मयूरा असा सगळा वर्ग हळूहळू ओळखीच्या चेहऱ्यांनी भरुन गेला. आणि मग प्रत्येक तासाला मी पटकन connect व्हायला लागलो. अर्थात ही ओळख नावांपुरती मर्यादित नव्हती. तर त्यांच्या आवडी, स्वभाव, इच्छा, पडणारे प्रश्न अशी बहुदिश होती.

अजून एक समस्या होती. जसा मी विद्यार्थ्यांना ओळखत नव्हतो तसे ते ही मला ओळखत नव्हते. मग त्यांनी माझ्याकडून का शिकावं? आणि त्यांनी माझ्याशी का मोकळं व्हावं?.. माझा bio-data वाचून ही ओळख पुरणार नव्हती. मी पुस्तकाबाहेरचं काही सांगू शकतो का, माझे अनुभव त्या त्या अभ्यासक्रमाला connect करुन उलगडून दाखवू शकतो का? प्रयत्न तर करुन पाहू. आणि मग ठरवून प्रत्येक तासाला असं sharing सुरु झालं. Tata Safari च्या pedal mounting bracket मधले tolerance, fit पासून शेतात घालायची खतं optimise करण्यासाठी वापरलेलं LPP technique असे विषय मुळच्या विषय शिक्षणाला जोड द्यायला लागलो आणि मग मी lecture enjoy करायला लागलो. पुस्तकाबाहेरचं पण विषयाला धरून असलेलं आपण काहीतरी सांगू शकतोय हा विचार आत्मविश्वास वाढवणारा होता. विद्यार्थ्यांना पण हे आवडत होतं हे त्यांच्या चेहेऱ्यावरून ,बोलण्यावरून स्पष्ट व्हायला लागलं. आणि मग Classroom ही कॉलेजमधली माझी सगळ्यात आवडती जागा झाली!

                                                       क्रमशः

अमर परांजपे

13 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. कृपया M.Tech. ला शिकविण्याच्या अनुभवविषयी पण लिहा.

    ReplyDelete
  3. Going back to college days
    As I read each blog.

    Nostalgia at its best

    ReplyDelete
  4. Great Sir
    Your help I can't forget in my life

    ReplyDelete
  5. It's very nice to read about WCE from your (a professor's) perspective...Going back to college memories through your words... I would love to read more and more about your Walchand Diaries...

    ReplyDelete
  6. Sir fb join krun publish kra bhrpur lokanparyant pohchel

    ReplyDelete
  7. मस्तच! शिक्षक आणि विद्यार्थी यांचं connect होणं महत्वाचं असतं हे आत्तापर्यंत लक्षात आलं नव्हतं, पण हे वाचताना लक्षात आलं की माझे सगळे चांगले शिक्षक असे connected होते.

    ReplyDelete
  8. shalet jevade apan shikshaka madhe invove asayacho tevadi me tari college years madhe involve navate. good that u took efforts to engage students n to know them!

    ReplyDelete
  9. Amar, tu nakkich changala aani mulanchyat popular teacher hota asanaar yachi mala khatri aahe :),

    ReplyDelete
  10. शिकायला हवं तुझ्याकडून....

    ReplyDelete

भाग २१ - वालचंद सोडताना

गेले सलग २० दिवस (मध्ये दोन दिवस सुट्टी सोडून) वालचंद कॉलेज मधले माझे अनुभव लिहितो आहे. लिहिण्यासारखे अजून बरेच आहे. पण मी काही लेखक नव्ह...