२०१० च्या ऑक्टोबर महिन्यातला एक
दिवस. PG
lab मधे
मी practical घेत होतो. चव्हाण सर दुसऱ्या काही
कामासाठी तिथे आलेले होते. ते आणि PG Lab चे श्री. वैद्य सर ह्यांची काहीतरी चर्चा चालू होती. “सर आता कोणाला तरी सोबत किंवा मदत म्हणून तरी
बरोबर घेऊन जात जा, एकट्यानी जाण्यापेक्षा” वैद्य सर चव्हाण सरांना सांगत होते. चव्हाण सर अनेक साखर कारखान्यांमध्ये vibration संबंधी consultancy करतात आणि त्यासाठी त्यांना बरेच फिरावे लागते
इतके माहिती असल्याने माझं लक्ष पण त्यांच्या संवादाकडे गेलं. “कोण येत नाही रे. आधी प्रवास, मग काम. ते पण साखर कारखान्यात, तसं कष्टाचं पण डोक्याचं काम हल्ली कोणाला आवडत
नाही असलं” इति चव्हाण सर. आणि मग हे असं ऐकून
"हल्लीच्या"
सर्वांची जबाबदारी माझ्यावर असल्यासारखे आपणहूनच मी विचारलं, “मी येऊ का सर? परत कधी जाणार आहात तेव्हा?” माझ्याकडे अविश्वासानी बघत सर म्हणाले, “आजच जायचंय संध्याकाळी. माझे नेहमीचे ड्रायव्हर आज नाहीयेत त्यामुळे
कोणीतरी ड्रायव्हर मिळाला कि निघणार आहे.” मी तत्काळ उत्तर दिलं, “सर, मला
येते गाडी चालवायला आणि मला सलग जास्ती अंतर गाडी चालवायची सवय पण आहे.” सरांचा ड्रायव्हरचा प्रश्न सुटल्यामुळे का होईना
ते लगेच तयार झाले. आणि दुपारी ४ च्या सुमारास आम्ही दोघे निघालो. उंब्रज जवळच्या
जयवंत शुगर्स ह्या कारखान्यात जायचं होतं. तिथे जाऊन नेमकं काय काम असतं हे काहीही
माहित नसताना मी निघालो होतो. काहीतरी नवीन शिकायला मिळेल एवढंच माहिती होतं आणि
बरोबर होते चव्हाण सर. त्यावेळी याची अजिबात कल्पना नव्हती कि पुढची १० वर्ष ह्याच
कामातून माझी एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे आणि बरोबरची व्यक्ती गुरु, सखा, सोबती
ह्या सगळ्या भूमिका निभावणार आहे. चव्हाण सर भेटण्याची ती खरी सुरुवात होती
माझ्यासाठी.
जयवंत शुगर्स मधे संध्याकाळ होता होता
आम्ही पोचलो. तिथे एका मशीनला vibrations जास्ती होती आणि त्यासाठी सरांना बोलावलेलं होतं. गेल्या
गेल्याच काम चालू झालं. मला फारसं काही कळत नव्हतं आणि सर पण काही जास्ती बोलत
नव्हते. बरोबर नेलेले equipment उचलून इकडून तिकडे नेणे, सर सांगतील ते आकडे लिहून घेणे वगैरे काम करत होतो आणि बरोबर
अर्थातच निरीक्षण चालू होतं. मधे चहा आला आणि कामात थोडी विश्रांती. आणि मग मला
माझ्या शंका विचारायची संधी. सरांकडून जुजबीची उत्तरं. पण vibration हा आवडीचा विषय असल्याने थोडंथोडं कळत होतं. अखेर
रात्री
१०-१०.३० च्या आसपास काम संपलं. सांगली मधे पोचायला रात्री चे १२ वाजून
गेले. परतीच्या प्रवासात सर अगदी थोडं बोलले त्यामुळे थोडंफार शंका निरसन झालं
होतं.
पण “सकाळी ८ चा तास आहे ना तुझा, वेळेवर जा तासाला. माझा पण ९ ला आहे तास. भेटूच“ हा मूळ आग्रहाचा मुद्दा होता. तो अधिक आग्रहाने बोलून सरांनी मला अच्छा केलं. काय विलक्षण माणूस
आहे हा? इतका विचार करत मी झोपलो त्या दिवशी.
दुसऱ्या दिवशी १० वाजता चहा प्यायच्या
जागी भेटल्यावर पहिला प्रश्न – “८ चा तास झाला का तुझा?” बाहेरची कितीही कामे केली तरी होता होईतो तास चुकवायचे नाहीत हे
तेंव्हाच मनात इतकं पक्कं बसलं कि शेवटपर्यंत तसा प्रयत्न करत राहिलो. २-३
दिवसांनतर परत एकदा संधी मिळाली. ह्यावेळी कर्नाटकात बागलकोटजवळ बिळगी शुगर्स मधे जायचं होतं. एकेरी अंतर अंदाजे
२०० किमी. तू येणार असशील तर मग ड्रायव्हर बरोबर घेत नाही हे सरांचं वाक्य ऐकून
म्हंटलं
“चला एकंदर driving तरी पसंत पडलंय”. बरोबर MTech करणारे १-२ विद्यार्थी पण होते. त्या दिवशी काम पण खूप होतं
त्यामुळे शिकायला पण बरंच मिळालं. परतीच्या प्रवासात प्रचंड पाऊस पडला. driving चं सगळं कसब पणाला लावून सांगली पर्यंतचा प्रवास
करावा लागला. त्यावर्षीच्या सिझनमधे असंच अजून १-२ ठिकाणी सरांबरोबर जायची संधी
मिळाली.
२०११ मधे मग मी सरांबरोबर जाणार हे
सरांनी पण मान्य केलेलं होतं. आणखीन एक दोन वेळा सरांबरोबर गेलो आणि एके दिवशी अचानक सर म्हणाले, “अरे, उद्या
ते अमुक तमुक कारखान्यात जायचं आहे पण मला विभाग प्रमुख बैठकीसाठी कॉलेज मधे
थांबणं आवश्यक आहे. तर तू जाऊन ये.” ते
इतक्या सहजपणे म्हणाले पण मी मात्र “मी...
एकटा, कारखान्यात....“ असं काहीतरी बोलायचं प्रयत्न करत होतो आणि तिकडे सरांनी फोन पण लावला त्या कारखान्यात आणि येतोय सांगितलं. देवा, परमेश्वरा, आता
तूच वाचव रे बाबा मला! पण मग ठरवलं कि स्वीकारुया आव्हान.
(टेंशन तर आलंच होतं पण पर्याय नव्हताच आणि सरांना नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता) अगदीच
एकट्याने जाण्यापेक्षा म्हणून मग MTech चा एक विद्यार्थी आणि मी जायचे ठरले. मधल्या काळात आमच्या
कामाला उपयुक्त असं एक नवीन equipment कॉलेज मधे घेतलेलं होतं आणि ते वापरायला पण मला जमायला लागलेलं
होतं हे माझं नशीब. “काही लागलं तर कधीही फोन कर मला” एवढं आश्वासन मात्र सरांनी दिलं होतं. ज्या कारखान्यामध्ये जायचं होतं तिथे सर पण
पूर्वी गेलेले नव्हते. म्हणजे तिथे प्रत्यक्ष कुणी चव्हाण सरांना पाहिलेलं नव्हतं.
पण या क्षेत्रामध्ये सरांचं नाव खूप मोठं
होतं. मग दुसरा संपूर्ण दिवस मी चव्हाण नसून परांजपे आहे हे अजिबात कोणाला कळू ना
देता दिवसभर काम करून तिथून बाहेर पडलो. फोन करून सरांची मदत घ्यावी लागेल अशी
समस्या सुदैवाने आली नाही. पण त्याच दिवशी ठरवलं कि एक दिवस माझं नाव सांगून मला
कारखान्यात जाता आलं पाहिजे.
२०११ मधे प्रा. अजित पाटील सर पण आमच्या टीम मधे सामील
झाले आणि मलाही मग
जास्तच उत्साह
आला. चव्हाण सरांकडून नवनवीन गोष्टी शिकणं, त्याचा अभ्यास करणं, त्यावर
परत चर्चा असं
आमच्या दोघांचं
सुरू झालं. २०१३ मधे सर कॉलेजचे registrar झाले आणि मग त्यांना कॉलेज मधून बाहेर पडायचं अवघड झालं. अनेक
ठिकाणी मग मी आणि पाटील सर जायला लागलो. नुसतं technical ज्ञान असून पुरत नाही, किंवा फक्त अनुभव असून भागत नाही तर तुम्ही काय करताय किंवा काय
सांगताय हे लोकांना पटवून देता यायला पाहिजे. तसाच तुमच्याबद्दल विश्वास पण वाटला
पाहिजे. २०१२
च्या डिसेंबर
मधला एक प्रसंग...जमखंडी शुगर्स चा दुसरा कारखाना कर्नाटकात विजापूर च्या पुढे
ईंडी तालुक्यात नादकेडी ह्या गावी चालू होणार होता. fibriser म्हणून एक भलं मोठं मशीन असतं त्याला खूप जास्ती vibration होती. अर्थातच सरांना आमंत्रण आलेलं होतं. मी, सर, आणि
एक दोन विद्यार्थी असे कारखान्यावर गेलो. पण अख्खा दिवस वाट पाहून सुद्धा ते मशीन
काही चालू झालं नाही. आम्ही परत आलो. २ दिवसांनी ते मशीन चालू झालंय असा निरोप
आला. पण नेमकं त्या दिवशी सरांना जमणार नव्हतं आणि पाटील सर पण कामासाठी बाहेरगावी
गेलेले होते. मग एवढ्या लांब एकट्याने जायला नको म्हणून मला सोबत करायला आडमुठे सर
आले. सकाळी १० वाजता आम्ही कारखान्यामध्ये पोचलो. पण परत काही तांत्रिक अडचणींमुळे
संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते मशीन सुरूच झालं नाही. डिसेंबर चे दिवस असल्याने अंधार
पण लवकर पडला होता. त्या दिवशी कारखान्यमध्ये उसाचे गाळप सुरु व्हायचे होते
त्यामुळे १०० एक शेतकरी उस घेऊन आलेले होते. अखेर संध्याकाळी साडेसहा वाजता ते
मशीन सुरु झालं. खूप जास्ती vibrations होती आणि ते मशीन ठीक झाल्याशिवाय कारखाना चालू होऊ शकत नव्हता.
मोजलेल्या vibrations
चं analysis केल्यावर मी निर्णय घेतला कि two plane balancing करायचं. नेहमी आम्ही ह्या प्रकारच्या
मशीनला single
plane balancing करायचो.
पण इथे vibration
जास्ती
असल्यामुळे दुसरा पर्याय नव्हता. मी कामाला लागलो. कारखाना पण नवीन असल्यामुळे धड लाईटची पण सोय
नव्हती. अनेक आडथळे येत मी प्रक्रिया पूर्ण केली आणि मशीन सुरु केलं, पण नशीब माझ्या विरुद्ध होतं त्यादिवशी. Vibration मधे विशेष काही फरक पडला नाही. एव्हानी रात्रीचे
१० वाजले होते. माझ्या परस्पर तिथल्या प्रमुख Engineer ने चव्हाण सरना फोन केलेला होता आणि “तुमच्या सहाकाऱ्याला काही जमत नाहीये. तुम्ही
उद्या पहाटे लवकरात लवकर या.” असं
सांगितलेलं होतं. माझा फोन पण battery संपून बंद पडलेला होता. त्यामुळे मी सरांचा सल्ला पण घेऊ शकत
नव्हतो. Give
up करून टाकूया, आपली काही लायकी नाहीये, असे सगळे विचार मनात यायला लागलेले होते. भूक लागून तीही भावना
संपलेली होती. पण अशी स्वतःची , त्याबरोबर
कॉलेजची
आणि पर्यायाने
चव्हाण सरांची
नाचक्की करून
घ्यायची नाही असं वाटलं. “अजून एक तास द्या मला” असं तिथल्या लोकांना सांगून परत एक प्रयत्न
करायला लागलो. हे मशीन एक प्रचंड मोठं धूड असतं. वजन जवळजवळ ८ टन. दिवसाला ५००० टन
उसाचा चोथा करण्याची ह्याची क्षमता. मी मशीनच्या आत उतरण्यासाठी वर चढलो. मशीन
अजून फिरायचं पूर्ण थांबलेलं नव्हतं. मी नव्याने weld केलेली वजनं चमकत होती. त्या चमकण्याला पण एक लय आलेली होती.
आणि हे काय... काहीतरी चुकतंय... लय मधे मधे बिघडतीय का...अरेच्चा मी मगाशी वजन
लावताना छोटी चूक केलीय तर... बास कधी एकदा मशीन थांबतंय आणि मी चूक दुरुस्त करतोय
असं होऊन गेलं .. पुढच्या १५ मिनिटात काम पूर्ण झालं. मशीन पुन्हा सुरु झालं आणि
काय आश्चर्य घरातल्या मिक्सर इतका पण आवाज नाही कि vibration नाहीत. जमलं तर मला. सगळे खुश झाले. नंतरच्या १० मिनिटात पूजा होऊन
कारखाना सुरु पण झाला. Chief Engineer ने आमचे आभार मानले आणि परस्पर सरांना फोन केल्याबद्दल दिलगिरी
पण व्यक्त केली.
“रात्रीचे १२
वाजलेत तेव्हा आता जेवण करा, जवळच्याच गावात हॉटेल मधे तुमची सोय
केली आहे तिथे झोपा आणि मग सकाळी परत जा.” अशी सूचना पण त्यांनी केली. जेवलो. निघालो. कारखान्यापासून
२किमी प्रवास झाला असेल नसेल, गाडीचे
चाक पंक्चर. आज काही खरं नाही. बरोबर battery संपलेले मोबाईल. तसेच अंधारात चाक बदलले. पण हे
करत असताना आमची झोप पळाली. मग जवळच्या गावात झोपण्यापेक्षा थोडं पुढे इंडी पर्यंत
जाऊया, मग विजापूर पर्यंत जाऊया, मग अथणी पर्यंत जाऊया असं करत करत
आम्ही पहाटे ४ ला सांगलीला पोचलो. त्या एका प्रसंगांनी माझ्यातला आत्मविश्वास खूप
वाढला. इतकंच नाही तर त्या engineer ला पण माझ्या क्षमतेवर विश्वास बसला. पुढच्या वर्षी त्याचा फोन
सरांच्या ऐवजी मला आला याहून अजून आनंद तो कसला !!
घरी जायची सोय नव्हती कारण मग रात्रभर
प्रवास केल्याचा अघोरीपणा केल्याबद्दल भरपूर बोलणी खावी लागली असती. आणि मग पहाटे ४ ला काँफी पिता पिता
सगळी कथा सांगावी लागली असती. अर्थात घरची म्हणून काही शिस्त असते आणि आपल्याच
काळजीपोटी
असते हे माहिती
होतं. मग मी
आडमुठे सरांच्या
घरी झोप काढून सकाळीच घरी परतलो. असे प्रसंग म्हणजे कारखान्यामुळे होणारा उशीर, वेगवेगळ्या वेळा आणि अचानक काँलेज मधून येऊन, उशीर होईल असं सांगून माझं जाणं, हे एव्हाना घरच्यांना परिचयाचे झाले होते. गमतीने पुढे बायको म्हणायला लागली की, anesthetist (भूलतज्ञ) on call असतात हे माहिती होतं पण आता प्राध्यापक पण on call असतात हे नवीन आहे. फरक एकच भूलतज्ञ अंघोळ करून स्वच्छ होऊन Operation च्या आधी भूल देतात आणि तुम्ही लोक ग्रीसने हात माखवून घेऊन मशीनची भूल(vibrations ) उतरवता आणि मग कारखान्याचं Operation सुरू होते. विनोदाचा भाग सोडला तर खरंच consultancy मधील आव्हानात्मक कामाची भूल माझ्यावर पडली
होती. आणि त्या अनुभवांचा उपयोग वर्गात करण्याची झिंगही!
(तांत्रिक आणि बिगर तांत्रिक तसंच कारखान्यामध्ये किंवा कॉलेज मधे आणखीन कोणती आव्हाने समोर आली, ह्या consultancy उद्योगाचा विद्यार्थ्यांना नेमका काय उपयोग झाला हे जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की वाचा.




Amhala pn khup kahi shikayala bhetla sir tumchya sobat consultancy la yeum
ReplyDeleteGreat Experience with our project guide Paranjpe Sir(crack analysis in rotating shaft.BTech 2014Batch)
ReplyDeleteSir mala pn thod kalal tumchya sobt consultancy sathi yeun actually on field kay problem astat. Te kase tackle karyche. Tumchya Sobt khup shikayla pn mialal .
ReplyDeleteमर्यादांना उल्लंघुनि नवं आव्हाना घेतो।। वृत्तीला सलाम
ReplyDeleteखूपच मस्त लिहिले आहेस...
ReplyDeleteमस्तच!
ReplyDeleteखूप छान लिहिलंय सर.
ReplyDeleteसगळे प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले..🙂👌👌
Marvellous
ReplyDeleteWell beginning is half done
ReplyDeleteअसंच काहीसं झालं म्हणावे लागेल .
त्यासाठी सुरुवातीला चव्हाण सरांसारखे गुरु मिळणं हे तुमचं भाग्य आणि चिकाटी कशी सोडू नये ही तुमची तळमळ लिखाणातून पोहोचवलीत ती आत्मियतेने वाचणा-या व आत्मसात करणाऱ्या तुमच्या शिष्यांच पण भाग्य !!
मस्त अनुभव .
ReplyDeleteतुम्ही काय आणि चव्हाण सर काय👌👌👌👌
ReplyDeleteग्रेट !!!
क्या बात हे.... प्रवास करायला हवा तुझ्या सोबत....
ReplyDelete